डॉ. विकास आमटे यांचे प्रतिपादन; नचिकेत सहकारश्रेष्ठ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण

आनंदवनमधील प्रत्येक व्यक्ती मुख्य प्रवाहात आली पाहिजे. तेथे राहणाऱ्या गरीब, वंचित, कुष्ठरोगी यांचा विमा नाही, बँकेत खाते नाही, ते आíथक अडचणीत आहेत, त्यांना कोणी हात लावायला तयार नाही, अशांना पथसंस्थांनी पुढाकार घेऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले पाहिजे, असे प्रतिपादन महारोगी सेवा समितीचे सचिव व समाजसेवक डॉ. विकास आमटे यांनी व्यक्त केले.

शंकरनगरातील साई सभागृहात आयोजित नचिकेत सहकारश्रेष्ठ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून डॉ. आमटे बोलत होते. यावेळी नचिकेत प्रकाशनचे संचालक अनिल सांबरे व श्रीनिकेत सांबरे व्यासपीठावर उपस्थित होते.

बाबांचे कार्य मोठे आहे. बाबांनी आमच्यासाठी काहीही केले नाही. आनंदवन आता २०० कोटींपर्यंत पोहोचले आहे. खऱ्या अर्थाने आज आमचे कार्य सुरू झाले आहे. आनंदवनात मोठे दवाखाने उभारण्यात आले आहेत. देशातील सर्वात मोठा बायोगॅस प्रकल्प आमच्याकडे आहे. हजारो कुष्ठरोगी, अंध, अपंग ज्यांना समाजाने नाकारले, अशी सर्व मंडळी आनंदवनात राहतात. सर्वाच्या पुढाकाराने या गरजू व कुष्ठरुग्णांची मदत करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आपण केले पाहिजे, असेही डॉ. आमटे म्हणाले.

बँकेत घोटाळे झाले तर त्याची चर्चा होते. मात्र, चांगले काम करणाऱ्यांची दखल घेतली जात नाही. या उद्देशानेच आम्ही सहकारश्रेष्ठ पुरस्कार सुरू केला असल्याचे अनिल सांबरे यांनी  सांगितले. यावेळी डॉ.आमटे यांच्या हस्ते नागरी बँक व पथसंस्था अशा दोन बँकिंग पोर्टलचा शुभारंभ आणि नचिकेत गौरव विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी राज्यातून प्रत्येक जिल्ह्य़ातील पथसंस्था व नागरी बँकेच्या संचालक, पदाधिकाऱ्यांना सर्वोत्तम सेवाकार्य, सर्वोत्तम वार्षिक अहवाल, सर्वोत्तम ग्राहकसेवा, सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा वापर अशा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जवळपास ५७ पुरस्कार यावेळी देण्यात आले. यामध्ये विवेकानंद नागरी सहकार प्रत्यय संस्था, श्री संत गजानन महाराज नागरी सहकारी पतसंस्था, गिरनार अर्बन क्रे.को-ऑप.सोसायटीसह विदर्भातील अनेक बँकांना पुरस्कृत करण्यात आले.

पालकमंत्री, वनमंत्र्यांची दांडी

सहकारश्रेष्ठ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती अपेक्षित होती. आमंत्रण पत्रिकेत त्यांची नावे अग्रक्रमांकावर होती. मात्र कार्यक्रम संपेपर्यंत दोन्ही मंत्री पोहोचू शकले नाही.

Story img Loader