नागपूर महापालिकेकडे शहराच्या आरोग्याची जबाबदारी आहे, पण त्याकडे दुर्लक्ष होत आहे. सर्वाधिक रुग्णांवर मेडिकल, मेयो, डागा, दंत, आयुर्वेद, मनोरुग्णालयात उपचार होत असले तरी खासगी रुग्णालयातही उपचार घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. उपचारात अचूकता येण्याकरिता रुग्णांची ‘ऑनलाईन’ नोंदणी सक्तीची करण्याची गरज आहे. त्यामुळे डॉक्टरांना रुग्णांचा इतिहास व तो घेत असलेल्या औषधांचीही अचूक माहिती मिळेल. यासाठी रुग्णांना ‘हेल्थकार्ड’ देणे हा एक चांगला ठरू शकतो.
शहराची लोकसंख्या ४० लाखांहून जास्त आहे. शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, डागा शासकीय स्मृती स्त्री- रुग्णालय, प्रादेशिक मनोरुग्णालय, कामगार विमा रुग्णालयासह अनेक खासगी रुग्णालये आहेत. महापालिकेच्या आखत्यारितही अनेक रुग्णालये असली तरी त्यात फार कमी रुग्णांवर उपचार होतात, पण खूप मोठे काम केल्याचा देखावा निर्माण केला जातो.
महापालिकेच्या एकाही रुग्णालयात गंभीर रुग्णांवर उपचाराची सोय नाही. सगळी जबाबदारी मेडिकल व मेयोवर झटकण्याचे काम महापालिका करीत आहे. शहरात अनेक मार्ग अरुंद आहेत. येथून रुग्णांना रुग्णालयांत हलवताना जास्त कालावधी लागतो. वेळेवर रुग्णालयात पोहोचत नसल्याने अनेक रुग्णांना जीवही गमवावा लागतो. लोकसंख्येच्या तुलनेत फारच कमी रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. महापालिकेकडे केवळ ४ रुग्णवाहिका असून त्यातीलही काही फार जुन्या स्थितीत आहेत.
मेडिकल व मेयो प्रशासनाकडे सहाच्या जवळपास रुग्णवाहिका चालू स्थितीत असल्या तरी रुग्णांना कुठूनच रुग्णालयात घेऊन येत नाही. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात अद्यावत मोबाईल दंत व्हॅनसह विद्यार्थ्यांकरिता स्कूल बस दिली गेली, परंतु चालक नसल्याने ही वाहने धूळखात आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात रुग्णांची प्रकृती बिगडली तर त्याला किमान पंधरा मिनिटात अद्यावत रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था हवी. शहरात अत्यावश्यक सेवांतर्गत १०८ क्रमांकाची अद्यावत रुग्णवाहिका शासनाकडून उपलब्ध असली तरी ४० लाख लोकसंख्येच्या मानाने त्यांचीही संख्या कमी आहे. सोबत या रुग्णवाहिका रुग्णांना शासकीयसह राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयांतच मोफत मिळते. स्मार्ट सिटीमध्ये रुग्णांना रुग्णवाहिकेतून मोफत पोहचवण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे. रुग्णाला अद्यावत सेवा देवून शहरातील मृत्यू कमी झाले तरी ही योजना लोकांकरिता लाभदायी ठरणे शक्य आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा