नागपूर : “इस जिंदगी का मकसद, मैं सबके काम आऊ, मैं चिराग रहगुजर हूँ, मुझे शौक से जलाओ” दंगल ही अफवेतून पसरते. दोन समुदायातील दंगल फक्त त्यांच्यापुरतीच मर्यादित राहत नसून दंगलीची झळ सर्वसामान्य नागरिकांनाही बसते. त्यामुळे दंगलीतून होणारे नुकसान हे भरून निघू शकत नाही. दंगलीतील जखमा मनावर खोलवर रुतून बसतात व एकमेकांची मने दुभंगतात, असे प्रतिपादन राज्याचे माजी पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केले.
डॉ. उपाध्याय यांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते म्हणाले, मागील दोन आठवड्यांपूर्वी नागपुरात दोन गटांत दंगल उसळली. त्यासाठी फक्त एक अफवा पुरेशी ठरली. अफवा परवण्यासाठी समाजात विशिष्ट स्थानावर असलेल्या लोकांचा मोठा हातभार होता. मात्र, एका अफवेने शहरातील सौदार्हपूर्ण वातावरणाला दृष्ट लागली. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि पवित्र रमजान महिना सुरू असताना अचानक दोन गट एकमेकांवर दगडफेक करीत होते.
दंगलीचा परिणाम दोन्ही गटांवर झाला. मोठे आर्थिक नुकसान झाले. या दंगलीचा परिणाम सर्वसामान्य माणसांवर जास्त झाला. गाड्यांची जाळपोळ आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. त्याची भरपाई आता नागरिकांनी भरलेल्या करामधून करण्यात येईल. दंगलीमुळे शाळा प्रभावित झाल्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले तसेच सामान्य जनजीवन विस्कळीत झाले. महिला, वृद्ध, कामगार, मजूर यांच्या जीवनव्यापनाचा प्रश्न निर्माण झाला. या दंगलीतून दोन्ही गटांचे बरेच नुकसान झाले.
शेकडो तरुणांवर दंगलीचे गुन्हे दाखल झाले तर अनेकांना आता न्यायालयाचे खेटे घालावे लागणार आहे. फक्त एक अफवा या सर्व घडामोडींना कारणीभूत ठरली. मात्र, अशा दंगली घडू नये म्हणून विविध धर्माच्या धर्मगुरूंनी पुढाकार घेऊन शांततेचे आवाहन करायला हवे.
कुणाच्यातरी स्वार्थासाठी माथी भडकणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. त्यांना सत्य आणि अफवा याबाबत समुपदेशन करायला हवे. कोणत्याही गोष्टीची पडताळणी करण्याबाबत आवाहन करायला हवे. कारण दंगलीतून भरून न निघणारे समाजाचे नुकसान होते. काही चुकीचे आढळल्यास लगेच स्वतः आक्रमक न होता किंवा अन्य युवकांना प्रोत्साहन न देता कायदेशीर मार्गाचा अवलंब करायला हवा. पोलीस ठाण्यात रितसर तक्रार आणि न्यायालयीन लढा लढून न्याय मिळवायला हवा, असे डॉ. उपाध्याय म्हणाले.
दंगली टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी
पालक, कुटुंब, शिक्षक, सामाजिक संघटना, समाजातील ज्येष्ठांनी दंगली होऊ नये म्हणून पुढाकार घ्यावा. संयम बाळगण्यास शिकवावे. कुटुंब प्रमुखाने आपल्या मुलाला चांगले संस्कार व शिकवण द्यावी. जेणेकरून कुणीतरी स्वतःच्या फायद्यासाठी दंगलीकडे वळण्यापासून त्याला परावृत्त करता येईल. पोलिसांनी सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी मोहल्ला समितीच्या बैठका, शांतता समितीच्या बैठका तसेच प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात पोलीस अधिकाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे डॉ. उपाध्याय म्हणाले.
पोलिसांची महत्त्वाची भूमिका
नागपुरात घडलेल्या दंगली वरिष्ठ अधिकारी रस्त्यावर उतरून स्वतः नेतृत्व करीत होते. तसेच दगडफेक, शस्त्रांनी हल्ला झाल्यानंतरही नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उभे होते. दंगलस्थिती सांभाळत होते. ही पोलिसांची सकारात्मक बाजू होती. तसेच दंगलीनंतरही पोलिसांनी अनेक वस्त्यात जाऊन सामान्य नागरिकांना सुरक्षेची हमी दिली. त्यामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढला. दंगलीला संपूर्ण शहरापर्यंत पोहचू न देता फक्त दोनच परिसरापुरते मर्यादित ठेवले. नागरिकांनीही पोलिसांच्या शांततेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. पोलिसांनी संयम बाळगला, हे सुद्धा महत्त्वाचे आहे, असे डॉ. उपाध्याय म्हणाले.
धार्मिक वादाबाबतचा संदेश पडताळून बघा
कोणत्याही चुकीच्या गोष्टाला कायदेशीररित्या विरोध करावा. परंतु, अनेक जण कायदा हातात घेतात. मात्र, अशी कृती न करता संविधान डोळ्यासमोर ठेवावे. कायद्यानुसारच विरोध करावा. दंगलीचा परिणाम शाळकरी मुलांवर पडतो. त्यामुळे प्रत्येक शाळेत संविधान शिकवायला हवे. कोणत्याही धर्मग्रंथात हिंसेला थारा नाही. धार्मिक वाद लोकांनी वेळीच ओळखायला हवा. सामाजिक सलोखा राखण्यासाठी प्रत्येकाने पोलिसांना मदत करावी. समाजमाध्यमांचा स्वैर वापर कुणी करू नये. ‘व्हॉट्सॲप’वर आलेला प्रत्येकच संदेश खरा असतोच असे नाही, त्यामुळे धार्मिक वादाबाबत संदेश आल्यानंतर पडताळून बघावा आणि पुढे पाठवण्यापासून दुसऱ्यांनाही रोखावे, असेही डॉ. उपाध्याय म्हणाले.