बुलढाणा : ग्रामीण भागात अजूनही ‘क्रेझ’ असलेल्या कोतवाल पदासाठी जिल्ह्यात भरती प्रक्रिया सुरू आहे. यापदासाठीही परीक्षा शुल्क आकारण्यात येत असून यावर कळस म्हणजे अर्जासाठीदेखील सर्वसामान्य उमेदवारांना पैसे मोजावे लागणार आहे.
नुकतेच पार पडलेल्या तलाठी पदाच्या परिक्षेसाठी निर्धारित शुल्कावरून वादंग उठले होते. त्या शुल्कापोटी शासनाच्या तिजोरीत लाखोंची रक्कम जमा झाली. या पार्श्वभूमीवर कोतवाल पदासाठी आकारण्यात येत असलेल्या शुल्कावरून वादंग उठण्याची शक्यता नाकारता येत नाही. २५ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर दरम्यान उमेदवाराना अर्ज सादर करावे लागणार आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ५०० रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना २५० रुपये शुल्क आकारणी करण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर भरावयाच्या अर्जाची किंमत २० रुपये आहे. अर्ज रद्द झाल्यास वा कोतवाल पदी निवड न झाल्यास हे परीक्षा शुल्क परत मिळणार नाही, असे शासन-प्रशासन तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या कोतवालला बऱ्यापैकी म्हणजे १५ हजार इतके मानधन मिळते. बेरोजगारीची समस्या गंभीर असल्याने व गावातच नोकरी मिळणार असल्याने या भरतीतही मोठ्या संख्येने अर्ज सादर होणार हे उघड आहे. यापरिणामी शासनाच्या तिजोरीत चांगलीच भर पडणार हे उघड आहे.
हेही वाचा – “सरकारी शाळा उद्योगपतींना विकू नका” महिला, मुलींसह समनक पार्टीचे रास्ता रोको
हेही वाचा – “भाजपा आणि बावनकुळेंमध्ये आता दम नाही”, अंबादास दानवेंचे विधान, म्हणतात..
दृष्टिक्षेपात परीक्षा
अर्ज थेट संबधित तहसील कार्यालयात सादर करावे लागणार असून शुल्क भरल्याची पावती जोडावी लागणार आहे. ६ ऑक्टोबर अर्जाची अंतिम मुदत आहे. २२ ऑक्टोबरला परीक्षा पार पडणार असून २६ ला ‘प्रारूप निकाल’ लागणार असून उमेदवारांच्या हरकतीचे निरसन केल्यावर ३० तारखेला अंतिम निकाल लागणार आहे. परीक्षा १०० गुणांची राहणार आहे.