नागपूर: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) सुरू असलेल्या बी.एड. प्रवेश परीक्षेमध्ये गोंधळ झाला आहे. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या ओळखपत्रामध्ये परीक्षेसाठी बुधवार, २६ एप्रिलची तारीख देण्यात आली होती. त्यानुसार विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचले. मात्र, हा पेपर कालच म्हणजे मंगळवारी घेण्यात आला असे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. त्यामुळे त्यांचा गोंधळ उडाला. ‘सीईटी सेल’च्या चुकीने वर्ष वाया जाण्याची भीती विद्यार्थी व्यक्त करीत आहेत.
‘सीईटी सेल’ने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयात परीक्षा केंद्र म्हणून दिले होते. शेकडो विद्यार्थी या केंद्रावर सकाळी ८ वाजता पोहोचले. परंतु, विद्यार्थी तेथे जाताच ही परीक्षा मंगळवारी सकाळी रायसोनी महाविद्यालयातील केंद्रावर झाली असे सांगण्यात आले. विद्यार्थी संख्या वाढल्याने अचानक परीक्षा केंद्र आणि तारीख बदलण्यात आल्याचे सांगितले. मात्र, विद्यार्थ्यांना आधी तशी कुठलीही पूर्वसूचना देण्यात आली नाही. परिणामी, विद्यार्थी त्यांच्याकडे असलेल्या ओळ्खपत्राच्या आधारे बुधवारी परीक्षा केंद्रावर पोहोचले. मात्र, ‘सीईटी सेल’च्या चुकीमुळे त्यांना परीक्षाच देता आली नाही. त्यामुळे विद्यार्थी चिंतेत आहेत.
विशेष म्हणजे, परीक्षा केंद्रावरील प्रमुखांनी नवीन ओळखपत्र आल्याचे सांगितल्यावर विद्यार्थ्यांनी चाचपणी केली असता नवीन ओळखपत्रावर मंगळवारीच पेपर असल्याचे नमूद आहे. मात्र, परीक्षेच्या तारखेत बदल झाला किंवा ओळखपत्र नव्याने देण्यात आल्याची कुठलीही सूचना विद्यार्थ्यांना मिळाली नाही.