नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने दरवर्षी बँक, रेल्वे, एलआयटी आदी पदभरतींचे प्रशिक्षण दिले जाते. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कर्मचारी निवड आयोग (एसएससी) आणि बँकेच्या परीक्षा होणार आहेत. असे असतानाही सामाजिक न्याय विभागातील काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे अद्यापही प्रशिक्षण सुरू झालेले नाही.
राज्यातील अनुसूचित जातीच्या युवक-युवतींना बँक, रेल्वे, एलआयसी आदी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण व पोलीस-मिलिटरी भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जाते. राज्यातील ३० प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून हा कार्यक्रम सुरू होता. मात्र, प्रशिक्षण केंद्रांचे अचानक काम बंद करण्यात आले आहे. नव्याने केंद्र निवड प्रक्रिया सुरू असल्याची माहिती बार्टीच्या संकेतस्थळावरून दिली जात आहे. यामुळे राज्यातील ७८ हजार विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण ठप्प आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाला २०१२ पासून सुरुवात करण्यात आली. यानुसार सर्व जिल्ह्यांमध्ये संस्था निवड प्रक्रिया पार पडली. २०१८ मध्ये पुन्हा सर्व जिल्हे मिळून एकूण ४७ प्रशिक्षण केंद्रांची निवड करण्यात आली. २०१८-२०१९ या कालावधीत प्रत्येक जिल्ह्यात ३०० विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. दरम्यान, ३ तपासण्या करून सर्व केंद्रांचे मूल्यमापन करण्यात आले. बार्टीच्या नियामक मंडळाने घालून दिलेल्या कठोर निकषांच्या आधारावर ४७ पैकी ३० प्रशिक्षण केंद्र पात्र ठरले.
हेही वाचा – नागपूर : ब्रेकअपनंतर प्रेयसीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; प्रियकरावर गुन्हा दाखल
ऑक्टोबर २०२१ ला शासन निर्णय निर्गमित करत मंजूर ३० प्रशिक्षण केंद्रांमार्फत हे प्रशिक्षण पुढील ५ वर्षे राबवण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. असे असतानाही नव्याने निवड प्रक्रिया सुरू आहे. जुलै महिन्यात ‘एसएससी’ तर ऑगस्ट महिन्यात बँकेच्या परीक्षा होणार आहेत. असे असतानाही प्रशिक्षण बंदच आहे. काही विद्यार्थी संघटनांनी यासंदर्भात नुकतेच बार्टीच्या महासंचालकांना निवेदन दिले.