नागपूर : खासगी प्रयोगशाळेत मेटान्यूमोव्हायरसचे (एचएमपीव्ही) निदान झालेल्या दोन संशयितांचे नमुने एम्स रुग्णालयातील प्रयोगशाळेत पोहचल्यावरही किट्स अभावी बुधवारीही तपासणी झाली नाही. दरम्यान गुरूवारी किट्स पोहचणार असून हे नमुने तपासण्याचे संकेत आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांकडून दिले गेले.
उपराजधानीतील एम्सच्या प्रयोगशाळेत मेटान्यूमोव्हायरस (एमएचपीव्ही) विषाणू तपासणीच्या किट्स नव्हत्या. येथे नागपूर महापालिकेकडून नागपुरातील दोन रुग्णाचे नमुने येताच झटपट किट्सची खरेदी प्रक्रिया मंगळवारी केली गेली. सुमारे ७२ हजार रुपये किमतीतून एक किट खरेदी झाली असून ही बुधवारी उपलब्ध होण्याचे संकेत दिले गेले. परंतु धुक्यामुळे रेल्वे व विमानांच्या वेळापत्रक विस्कळीत असल्याने ही किट पोहचली नाही.
हेही वाचा – नागपुरातील ‘एचएमपीव्ही’ संशयितांची तपासणी लांबणीवर, एम्स रुग्णालय…
दरम्यान संबंधित कंपनीला विनंती केल्यावर आता ही किट विमानाने एक प्रतिनिधी घेऊन गुरूवारी येणार असल्याचे संकेत आरोग्य विभागाकडून दिले गेले. किट्स अभावी पुढेही चाचणी थांबू नये म्हणून आता राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा (एनआयव्ही), पूणे आणि नागपूर महापालिकेलाही साकडे घातले गेले आहे. त्यानंतर पूणेच्या एनआयव्ही प्रयोगशाळेकडून काही किट्स गुरूवारी नागपुरात पाठवण्याचे आश्वासन दिले गेले. तर नागपूर महापालिकेकडूनही अधिकाऱ्यांनी दोन किट देण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु या किट्स आवश्यक निविदा प्रक्रियेनंतर उपलब्ध केली जाणार आहे. या किट्सच्या मदतीने नागपुरातील संशयितांचे नमुने एम्सला तपासले जाणार आहे. दरम्यान गडचिरोलीतील संशयितांचे नमुनेही बुधवारी एम्सला पोहचले नाही. तेथे दहाहून अधिक नमुने गोळा झाल्यावर हे नमुने एम्स लापाठवले जाणार असल्याचा निरोप एम्सच्या प्रयोगशालेला मिळाला आहे.
महापालिकेकडून सर्वेक्षण, रुग्णालयात ३० खाटांची सोय
‘एचएमपीव्ही’चे दोन संशयित रुग्ण आढळल्यावर महापालिका दक्षता घेत असून कार्यक्षेत्रात सर्वेक्षण केले जात आहे. शहरातील सर्व खाजगी व सरकारी रुग्णालयांनी सर्दी, खोकला अर्थात आय.एल. आय. रुग्णाबाबत महापालिकेला माहिती द्यावी. त्यासाठी हेल्पलाईन ९१७५४१४३५५ येथे संपर्क करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. या रुग्णांसाठी मेडिकल, मेयो, महापालिकेचे इंदिरा गांधी रुग्णालय येथे प्रत्येकी १० खाटा अशा एकूण ३० खाटा आरक्षीत आहे.
हेही वाचा – नागपूर पोलिसांवर नामुष्की, पळून गेलेला आरोपी गेला कुठे?
हे करा –
- खोकला किंवा शिंका येत असतील तर तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यूपेपरने झाका.
- साबण, पाणी किंवा सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा.
- ताप, खोकला किंवा शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
- भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक अन्नाचे सेवन करा.
- पुरेसे वायूविजन (व्हेंटिलेशन) होईल याची दक्षता घ्या.
हे करू नका –
- हस्तांदोलन करू नये.
- टिश्यू पेपर, रुमालाचा पुनर्वापर करू नका.
- आजारी लोकांशी जवळचा संपर्क ठेवू नका.
- डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नका.
- सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उपचार घेऊ नका.