नागपूरात होणाऱ्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेसाठी उत्साहात तयारी सुरू आहे. सभा नियोजनासाठी काँग्रेसकडून पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यात निरीक्षक नेमण्यात आले. ते पूर्व तयारीचा आढावा घेत आहे. कळीचा मुद्दा म्हणजे, कोण किती कार्यकर्ते आणणार हाच आहे. जिल्ह्याचे निरीक्षक खासदार बाळू धानोरकर यांच्या मुखातून ते स्पष्टच उमटले.
हेही वाचा >>>सत्ताधारी भाजपचे धोरण शेतकरी विरोधी, शरद पवार यांचे टिकास्त्र
नागपूरच्या सभेसाठी जिल्ह्यातून पाच हजार कार्यकर्ते आणण्याचे ठरले. कोणता नेता किती आणणार, या प्रश्नावर ते म्हणाले की, प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून साडेबाराशे, असे चार क्षेत्रातून पाच हजार कार्यकर्ते नागपुरात दाखल होतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे व ठाकरे गटाचेही कार्यकर्ते येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या प्रत्येक गाडीचा तसेच गाडीतील प्रमुखाच्या भ्रमणध्वनीच्या क्रमांकाची नोंदणी होणार आहे. गर्दीसाठी काँग्रेसचा असा ताळेबंद हिशेब लावल्या जात आहे. त्याची जबाबदारी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांवर सोपवण्यात आली आहे. निरीक्षक असा हिशेब पत्रकारांपुढे सादर करत असताना त्यांच्या आजूबाजूला असणारे महत्त्वाचे नेते मात्र निघून गेले होते. ठाकरे गटाचे प्रमुख रविकांत बालपांडे यांना विचारणा केल्यावर ते म्हणाले की, पक्षाचा आदेश असल्याने आमचेही कार्यकर्ते जाणार.