नागपूर : उपराजधानीत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शनिवारी आयोजित एअर शोमध्ये सूर्यकिरण एरोबॅटिक आणि सारंग हेलिकाॅप्टरच्या चमूने केलेल्या चित्तथरारक कसरतींनी नागपुरकरांना भुरळ घातली. हा शो बघण्यासाठी रस्ते, घरांच्या छतांवर नागरिकांनी गर्दी केल्याचे चित्र होते.वायुसेना नगरातील मेंटेनन्स कमांडच्या परेड मैदानावर निमंत्रितांना हवाई थरार अनुभवता आला. यामध्ये सूर्यकिरण एरोबॅटिक टीम, सारंग हेलिकॉप्टर, ॲवरो, आकाशगंगा, एअर वॉरिअर्स ड्रिल टीम, एनसीसी ग्लायडर्स आदींचा समावेश होता. याप्रसंगी लढाऊ आणि मालवाहतूक करणाऱ्या विमानांची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी नागरिकांनी आजूबाजूच्या घरांच्या छतांवर गर्दी केली होती. एअरोमॉडेलिंग शो, वायुसेनेच्या बॅण्डचे सादरीकरण या कार्यक्रमातील विशेष आकर्षण होते.
‘आकाशगंगा’ या पथकाच्या १० सदस्यांनी ८ हजार फूट उंचावर या हवाई कसरती आणि प्रात्यक्षिके सादर केली. यामध्ये सूर्य किरण एरोबॅटिक टीम, सारंग हेलिकॉप्टर एअर डिस्प्ले टीम, आकाशगंगा टीम आणि एअर वॉरियर ड्रिल टीम यांचा समावेश होता. इतर उपक्रमांमध्ये पॅरा हँड ग्लाइडिंग, वाहतूक आणि लढाऊ विमानांद्वारे फ्लायपास्ट, आयएएफ उपकरणांचे प्रदर्शन, एरो- मॉडेलिंग आणि एअर फोर्स बँडचे सादरीकरण झाले. आकाशगंगा टीमने तिरंगा ध्वज उंच नेला. आणि शेवटी संघातील तीन सदस्य तिरंगा घेऊन उतरले. हा उपस्थितांसाठी अभिमानाचा क्षण होता.
डॉर्नियर विमानातून आठ हजार फूट उंचीवर स्कायडायव्हिंग करण्यात आले. या चित्तथरारक प्रात्यक्षिकाने नागपूरकर थक्क झाले. ॲवेरो हे मध्यम आकाराचे वाहतूक विमान जमिनीपासून ५०० फूट उंचीवर उडत होते. दरम्यान ‘सूर्यकिरण’च्या चमूमध्ये ग्रुप कॅप्टन जी. एस. ढिल्लन, विंग कमांडर ए. यादव, विंग कमांडर आर. बोरदोलोई आणि इतरही अधिकाऱ्यांचा समावेश होता.
हेही वाचा: भारत जोडो यात्रा आता जनआंदोलन: भाजप सरकारला जनताच खाली खेचेल : नाना पटोले
अमरावती मार्गावर वाहतुक कोंडी
एअर शोच्या दरम्यान नागरिकांनी घराच्या छतांसह अमरावती रोड व इतरही मार्गांवर गर्दी केली होती. यावेळी अनेकांनी रस्त्यावरच वाहने उभी केली होती. त्यामुळे येथे वाहतुकीस अडथळे निर्माण झाल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली. वाहतूक कोंडीमुळे परिसरातील नागरिकांनी रोष व्यक्त केला.