गडचिरोली : जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पहिली ते आठव्या वर्गासाठी सुरू केलेला ‘फुलोरा’ हा उपक्रम विद्यार्थ्यांना अभासक्रमापासून दूर नेणारा आहे. त्यामुळे सदर उपक्रम बंद करण्यात यावा, असे निर्देश राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांना पत्र लिहून दिले आहे. विशेष म्हणजे शिक्षकांनीसुद्धा या उपक्रमाला विरोध केला होता.

अनेकदा विद्यार्थी शिक्षणात मागे राहतात. या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष झाल्याने जसजशी वर्गाची पायरी वाढते तसतसे हे विद्यार्थी मागे पडतात. जे विद्यार्थी अभ्यासक्रमात मागे आहेत. त्यांना शिकविण्यासाठी व इतर विद्यार्थ्यांच्या श्रेणीत आणण्यासाठी जिल्हा परिषदेचे तत्कालीन सीईओ कुमार आशीर्वाद यांनी फुलोरा हा उपक्रम सुरू केला. मूलभूत क्षमतांचा विकास न झालेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना स्वतंत्र शिकविण्याचे धोरण या उपक्रमाअंतर्गत सुरू झाले. प्रत्येक तालुका स्तरावर तीन याप्रमाणे ३६ फुलोरा सुलभक नेमण्यात आले. या सुलभकांना जिल्हास्तरावर प्रशिक्षण देण्यात आले. सुलभ तालुक्यातील शाळांना भेटी देऊन शिक्षकांना मार्गदर्शन करीत होते. या उपक्रमामुळे मागे पडलेले विद्यार्थी सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या श्रेणीत आले असल्याचा दावा काही शिक्षकांनी केला आहे. मात्र, काही शिक्षक फुलोरा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांवरील बोजा वाढला असा आरोप करीत आहेत. सीईओ आशीर्वाद जिल्ह्यात असेपर्यंत हा उपक्रम शिक्षक राबवत होते. मात्र, त्यांची बदली होताच त्याला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. कार्यशाळा, परिषदांमध्ये फुलोरा उपक्रम बंद करावा, अशी मागणी करीत आहेत. त्यात मंत्री आत्राम यांच्या पत्राची भर पडली आहे. त्यामुळे लवकरच हा उपक्रम बंद करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येऊ शकतो.

हेही वाचा – चक्क सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या घरी चोरीचा प्रयत्न

प्रतिनियुक्तीची पळवाट

विद्यापरिषदेची परवानगी नसलेला हा शैक्षणिक उपक्रम नियमबाह्य आहे. असे काही शिक्षकांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. अशा स्थितीत सुमारे ३६ शिक्षकांना फुलोरा सुलभक म्हणून प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. त्यामुळे रिक्त पदांचा भार वाढत चालला आहे. शिक्षक व विद्यार्थ्यांवरील कामाचा भार वाढत चालला असल्याचा आरोप शिक्षकांकडून होत आहे.

हेही वाचा – धक्कादायक! सिगारेटचे चटके देऊन चिमुकलीचा अनन्वित छळ, घरकामासाठी परराज्यातून आणले

काहींनी केले उपक्रमाचे कौतुक

फुलोराच्या निमित्ताने प्रत्येक शाळेत बालभवन निर्माण करण्यात आले आहे. या बालभवानात शेकडो शैक्षणिक साहित्य ठेवले आहेत. ही जमेची बाजू आहे. मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम चालना देणारा ठरला. बाहेरून आलेल्या तज्ज्ञांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे, असा दावा या उपक्रमाची बाजू मांडणाऱ्या शिक्षकांनी केला आहे.

Story img Loader