भंडारा : ओडिशाहून आलेल्या रानटी हत्तींच्या कळपाने अखेर भंडारा जिल्ह्याचा निरोप घेतला असून त्यांचा परतीचा प्रवास आता सुरू झाला आहे. १३ दिवस जिल्ह्यात मुक्कामी असलेल्या हत्तींनी अखेर शुक्रवारी पहाटे गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश केला. हत्ती जिल्ह्याबाहेर गेल्यानंतर वनविभागासह नागरिकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.
ओडिशा राज्यातून महाराष्ट्रातील गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यातून २३ हत्तींचा कळप २७ नोव्हेंबर रोजी भंडारा जिल्ह्यात दाखल झाला होता. दिवसभर जंगलात विश्रांती आणि रात्री मार्गक्रमण व खाद्याचा शोध, असा या हत्तींचा दिनक्रम होता. लाखनी, लाखांदूर आणि साकोली तालुक्यात या हत्तींनी काही प्रमाणात शेती आणि घरांचे नुकसान केले. झाडगाव, केसलवाडा, सिरेगाव या परिसरात नुकसानीची नोंद करण्यात आली आहे. २९ नोव्हेंबर रोजी हत्तींच्या कळपाने लाखनी तालुक्यातील बरडकिन्ही जंगलात प्रवेश केला . रेंगेपार कोहळी व चिचटोला येथील धानाचे पंजाने आणि ऊस शेतीचे नुकसान झाले आहे. ३ डिसेंबर रोजी देवरी गोंदी परिसरात तसेच शिवनी, मोगरा, झरप, गडपेंढरी, गिरोला, मुरमाडी तुपकर या परिसरातही हत्तींनी शेतीचे काही प्रमाणात नुकसान केले.
७ डिसेंबर रोजी हत्तींचा कळप लाखांदूर तालुक्यात शिरला. दहेगाव येथून सोनी इंदोरा मार्गे हत्तींचा कळप शुक्रवारी पहाटेच्या सुमारास गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाला.जिल्ह्यात हत्तींमुळे कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीची नोंद नाही. भंडारा जिल्ह्यात हत्तींचा कळप दाखल झाल्यापासून वनविभाग त्यांच्यावर लक्ष ठेवून होता.
हेही वाचा: रानटी हत्ती गावात अन् गावकरी विस्थापित ; नागनडोहवासियांची दिवाळी आश्रय छावणीतच !
हत्ती मानवी वस्तीत शिरणार नाही याची दक्षता घेतली जात होती. उपवनसंरक्षक राहुल गवई यांच्या मार्गदर्शनात फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्राधिकारी संजय मेंढे यांच्यासह तब्बल ६० कर्मचाऱ्यांचे पथक हत्तींच्या मागावर होते. ड्रोन कॅमेऱ्याद्वारे हत्तींच्या हालचालींवर वनविभागाचे पथक लक्ष ठेवून होते. हत्ती नियंत्रणासाठी पश्रिम बंगालच्या सेज संस्थेची मदतही झाली. हत्तींचा कळप जिल्ह्याबाहेर गेल्याने वनविभागासह नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.