|| देवेश गोंडाणे
नागपूर : भारतातील महागडी शिक्षण पद्धती, जागांची कमतरता आणि आरक्षित जागांमुळे बसणारा फटका अशा कारणांमुळे भारतातील बहुतांश विद्यार्थी रशिया, युक्रेन, चीन आणि फिलिपाईन्ससारख्या देशांमध्ये वैद्यकीय शिक्षणाला प्राधान्य देत असल्याचे शिक्षण तज्ज्ञांनी सांगितले. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धानंतर युक्रेनमध्ये वीस हजारांवर भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची बाब समोर आल्याने भारतीय विद्यार्थी विदेशात वैद्यकीय शिक्षणाला अधिक पसंती देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर येथे अडकलेले भारतीय विद्यार्थी मायदेशी परतण्यासाठी विविध माध्यमातून भारत सरकारकडे विनंती करीत आहेत. भारतातील जवळपास वीस हजारांवर विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे. यातील सरासरी ८० टक्के विद्यार्थी हे वैद्यकीय शिक्षणासाठी गेले असल्याची माहिती तेथील काही विद्यार्थ्यांनी दिली. भारतात वैद्यकीय शिक्षणासाठी खासगी शिक्षण संस्थांमध्ये चार वर्षांच्या अभ्यासक्रमाला किमान ५० लाखांहून अधिकचा खर्च येतो. (शिष्यवृत्तीधारक नसल्यास) तर युक्रेनमध्ये हीच पदवी घेण्यासाठी अर्धा म्हणजे २५ लाखांपर्यंतचा खर्च लागतो. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती बेताची असते, ते अशा देशांमध्ये जाऊन वैद्यकीय शिक्षण घेण्यास पसंती देत असल्याचे शिक्षणतज्ज्ञ पाणिनी तेलंग यांनी सांगितले.