लोकसत्ता टीम
वर्धा : आपल्या वऱ्हाडी बोलीने सर्वत्र ओळखले जाणारे नितेश कराळे सध्या नाराज आहेत. ते एक प्रखर मोदी विरोधक म्हणून ओळखले जातात. कराळे ‘इंडिया’ आघाडीचे समर्थक असल्याचे सांगतात. परंतु, याच आघाडीचा घटक पक्ष असलेल्या सेनेच्या ठाकरे गटाची सदिच्छा भेट घेण्याची त्यांची इच्छा होती. म्हणून सोमवारी सकाळी त्यांनी मुंबईत ‘मातोश्री’ गाठले. पण, त्यांना आलेला अनुभव अत्यंत वाईट होता, असे त्यांचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मी अंबादास दानवे यांचे सचिव पंडित यांना फोन केल्यावर त्यांनी ठाकरे यांचे खाजगी सचिव मात्रे यांचा मोबाईलक्रमांक दिला. बंगल्यावर गेल्यावर त्यांना अनेकवेळा फोन केले. पण उत्तर मिळाले नाही. मातोश्रीवर उपस्थित पोलिसांशी बोललो तेव्हा ते म्हणाले, बारा वाजताशिवाय भेट होणे शक्य नाही. या दरम्यान माझ्यासाठी अनेक जिल्हाप्रमुखांनी म्हात्रेंना फोन केले. बऱ्याच वेळाने म्हात्रेंनी निरोप पाठविला. मात्र ते चिडूनच बोलले. मी तुला बोलावले काय, असे ते दरडावले. तिथे उपस्थित विनायक राऊत यांच्याशी भेट झाली. त्यांनी माझे प्रोफाईल मागितले. उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठवितो म्हणाले. मात्र नंतर त्यांनी आदित्य ठाकरेंना भेटण्याचे सुचविले. ठाकरेंशी भेट न मिळाल्याने मी बाहेर पडू लागलो. मग मात्र निरोपावर निरोप आले. मी मात्र स्पष्ट नाकारले. आम्ही अपमान करून घेण्यासाठी आलो काय, असे म्हणत परत फिरल्याचे कराळे सांगतात.

आणखी वाचा-बुलढाणा : ‘मूक वात्सल्याचे’ प्रदर्शन! बकरी झाली कालवडची ‘आई’, ठरले बक्षिसाचे मानकरी

महाराष्ट्राचे नेते म्हणवतात अन घरी अशी वागणूक मिळते. धड बसायला जागा नाही. चहा विचारणे नाही. हे काय पटण्यासारखे नाही. अशाने सेना संपायला वेळ लागणार नाही, अशी खदखद कराळे यांनी व्यक्त केली. काँग्रेसच्या तिकिटावर लढण्याची चर्चा असताना सेनेकडे कसे, अशी विचारणा केल्यावर ते म्हणतात की सध्या निश्चित नाही. मात्र इंडिया आघाडीकडून लढण्याचे ठरविल्याने आघाडीचा घटक पक्ष असणाऱ्या सेना श्रेष्ठीच्या बंगल्यावर गेलो. मात्र सकाळी साडे सात ते दुपारी अडीचपर्यंत जो अनुभव आला, तो अत्यंत वाईट ठरला.