लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्रपूर : उत्पादनाच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठ्या औष्णिक ऊर्जा केंद्रांपैकी एक असलेल्या स्थानिक चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात मोठा स्फोट होऊन ५०० मेगावॉटच्या संच क्रमांक ९ मध्ये आग लागली आणि संच बंद पडल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, ही घटना दहा दिवसांपूर्वी १३ जानेवारीला घडली. परंतु, प्रसार माध्यमाला तसेच अन्यत्र कुणाला कळू नये यासाठी कमालीची गुप्तता पाळण्यात आली. हा संच अद्यापही बंद असून किमान दोन ते तीन महिने संच दुरुस्तीला लागतील अशी माहिती आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाऔष्णिक वीज केंद्राच्या संच क्रमांक ९ मध्ये मोठा स्फोट झाल्याने वीज केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भीती पसरली होती. या स्फोटानंतर वीज केंद्राच्या युनिट क्रमांक-९ मध्ये आग लागली, त्यामुळे ते युनिट ठप्प झाले. १३ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला होता. वीज केंद्र प्रशासन या स्फोटाची घटना गुप्त ठेवली आहे. या स्फोटामुळे युनिट क्रमांक ९ चे मोठे नुकसान झाले आहे. या संचाची नुकतीच देखभाल व दुरुस्ती करण्यात आली होती. खापरखेडा येथून नुकतीच बदली झालेले विजय राठोड यांची वीज केंद्रात मुख्य अभियंता पदावर नियुक्ती झाली आहे, त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून, येथे येताच वीज केंद्रात ही मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

दरम्यान, वीज केंद्राचे अधिकारी माहिती देण्यास तयार नाहीत. स्फोटानंतर ५०० मेगावॉट क्षमतेचे संच क्रमांक ९ बंद आहे. त्यामुळे या संचामधून वीजनिर्मितीही ठप्प झाली. संचामध्ये ज्या पद्धतीने अपघात झाला, ते पाहता हे संच पूर्ववत सुरू होण्यास बराच कालावधी लागू शकतो, असे सांगण्यात येते. हा कालावधी दोन महिन्यांपेक्षा जास्त असू शकतो. वीज केंद्र प्रशासन आता या स्फोटाचे नेमके कारण शोधण्यात व्यस्त आहे. यासाठी युनिटच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या सीमेन्स आणि भेल कंपनीच्या तज्ज्ञांच्या पथकांना येथे पाचारण करण्यात आले आहे. मात्र या दोन्ही कंपन्यांचे तंत्रज्ञ अधिकारी अजूनही येथे आलेले नाहीत. त्यामुळे संच दुरुस्तीचे काम रेंगाळलेले आहे. वीज केंद्रात स्फोटाचा आवाज ऐकून कामगारांमध्ये भीती पसरली. वीज केद्राच्या संच क्रमांक ९ च्या जनरेटर स्टेटरला आग लागल्याचे दिसले, तेव्हा संच क्रमांक ९ मध्ये स्फोट झाल्याचे समजले. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की तो काही अंतरावर असलेल्या संच क्रमांक नऊ ते संच क्रमांक आठपर्यंत ऐकू आला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explosion at chandrapur power station 500 mw unit shut down power station keeps secrecy rsj 74 mrj