लोकसत्ता टीम

नागपूर : कोतवालबड्डी गावालगत असलेल्या एशियन फायर वर्क्स दारुगोळा कंपनीच्या नियमानुसार दुपारी दोन वाजता जेवणाची सुटी होते. त्यानुसार २८ कामगार जेवणाचे डबे घेऊन कंपनीच्या बाहेर पडले. याच दरम्यान कंपनीत स्फोट झाला. त्यात कंपनीत थांबलेल्या दोघांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. जर जेवणाच्या सुटीपूर्वी कंपनीत स्फोट झाला असता तर मोठा अनर्थ झाला असता.

कंपनीत जवळपास ५० पेक्षा जास्त कामगार दारुगोळा कंपनीत कामाला आहेत. रविवार काही कामगारांची साप्ताहिक सुटी असते. त्यामुळे १७ पुरुष आणि १६ महिला कामगार असे एकुण ३३ कामगार कंपनीत काम करीत होते. दुपारी दोन वाजता जेवणाची सुटी झाली आणि २८ महिला-पुरुष कामगार आपापले डबे घेऊन जे‌वण करायला कंपनीच्या बाहेर पडले.

मात्र, ५ कामगार काम करीत होते. एका कामगाराने त्यांना आवाज दिला असता ‘आम्ही १० मिनिटांची मिक्सिंग करुन येतो’ असे म्हणून कंपनीत थांबले. पाचपैकी तीन जण अन्य दोघांची वाट बघत होते. तेवढ्यात मोठा स्फोट झाला. यामध्ये पाचही जण गंभीर जखमी झाले.

लक्ष्मण रजक आणि मुनीत मडावी या दोघांचा काही मिनिटांतच मृत्यू झाला तर सौरभ मुसळे , साहिल दिलावर शेख, घनशाम लोखंडे हे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जर ते पाचही जण वेळेवर जेवण करण्यासाठी डबे घेऊन कंपनीच्या बाहेर पडले असते तर घटना टळली असती, अशी चर्चा आहे.

सखोल चौकशी करा – बावनकुळे

या स्फोटात दोघांचा मृत्यू तर तीन जण गंभीर झाल्याच्या घटनेत कामगारांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेतली असून सखोल चौकशी करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे जिल्हा प्रशासनाला दिले. प्रशासनातील सर्व सबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. बचाव आणि मदत कार्याबाबत आपण प्रशासनाच्या संपर्कात राहून माहिती घेत आहे. या अपघातातील जखमींवर उपचार सुरू असून त्यांना प्रशासनातर्फे सर्वोतोपरी मदत केली जात आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या कामगार कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे पालकमंत्री बावनकुळे म्हणाले. जखमी कामगारांना उपचारात कोणतीही कमतरता पडू नये याची खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला त्यांनी दिले.

Story img Loader