नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात येत असलेल्या बीत्तलवाडी परिसरातील बारूद कारखान्यात रविवारी दुपारी स्फोट झाला. या स्फोटात दोन मजूर ठार झाले असून पाच मजूर गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या स्फोटाचे मुख्य कारण अद्याप स्पष्ट झाले नसून जखमी कामगारांना शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून गावकऱ्यांनी कंपनीच्या प्रवेशद्वाराकडे मोठी गर्दी केली आहे या स्फोटात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असून सध्या पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.

आगीवर नियंत्रण

एशियन फायर वर्क्स कंपनीत स्फोटामुळे मोठी आग लागली. कंपनीत ठेवलेले सर्व गठ्ठे आणि सामान आगीत जळाले. पोलिसांनी लगेच अग्निशमन दलाला पाचारण केले. काही वेळातच अग्निशमन दलाची सहा वाहने कंपनीत पोहचली. त्यांनी पाण्याचा मारा करीत दोन तास प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर काही वेळातच रुग्णावाहिका पोहचल्या. गंभीर जखमींनी लगेच शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

गावकऱ्यांची गर्दी

एशियन फायर वर्क्स कंपनीत स्फोट होताच मोठा आवाज झाला तसेच कंपनीला आग लागली. त्यामुळे आजुबाजुच्या गावातील अनेकांनी कंपनीच्या दिशेने धाव घेतली. काही मिनिटांतच स्फोटाची वार्ता अनेकांपर्यंत पोहचली. त्यामुळे कंपनीत गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. काही गावकऱ्यांनी कंपनीतील कर्मचाऱ्यांना मदत केली. मात्र, अनेक जण बघ्याच्या भूमिकेत असल्यामुळे पोलिसांनाही कर्तव्य बजावताना अडचणीचे ठरत होते, हे विशेष.

थोडक्यात वाचले दोघे

कंपनीत काही कामगार दुपारी काम करीत होते. मात्र, रविवार असल्यामुळे काही कामगार कंपनीच्या बाहेर गेले होते. तर दोन कामगार स्फोट होण्याच्या अगदी काही मिनिटांपूर्वीच कंपनीच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहचले. तेवढ्यातच त्यांना स्फोट झाल्यामुळे आवाज आला. त्यांनी कंपनीबाहेर न जाता कंपनीत स्फोट झाल्याच्या ठिकाणी धाव घेतली. मात्र, त्या दोघांचेही नशिब बलवत्तर होते म्हणून ते थोडक्यात वाचले, अशी चर्चा होती.

सलील देशमुख यांची घटनास्थळाला भेट

एशियन फायर वर्क्स कंपनीत स्फोट झाल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) नेते सलील देशमुख यांनी कंपनीत धाव घेतली. त्यांनी दोन्ही मृतकांच्या कुटुंबियांची भेट घेतली. गंभीर जखमींच्या नातेवाईकांशी चर्चा केली. स्फोट झालेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत कार्यकर्ते होते.

Story img Loader