नागपूर : ‘आमच्या दोघांचेबी वय झाले, आता शरीर थकल्यामुळे काम होत नाही. पण, मुलाने हिम्मत दिली. तुम्ही घरीच रहा मी काम करतो, अशी आमच्या वयोवृद्ध आई-वडिलांच्या जबाबदारीसाठी कंपनीत कामाला लागला. अन् रात्री कंपनीत स्फोट झाल्याचे समजले. म्हणून आम्ही दोघेबी रात्रभरापासून कंपनीच्या दारावर बसलोय. मुलगा चालत बाहेर येईल, अशी आस असल्याने डोळा न लावता दाराकडे टकमक बघत बसलो. पण दुसऱ्या दिवशी माया मुलाचा मृतदेहच बाहेर आला,’ अशी व्यस्था शकुंतला आणि गंगाधर निहारे यांनी प्रसारमाध्यमांकडे मांडली.

उमरेडमधील एमएमपी अल्यूमिनियम फॉईल आणि पावडर बनविणाऱ्या कंपनीत जवळपास १५० मजूर शुक्रवारी सायंकाळच्या पाळीत काम करीत होते. कंपनीत अचानक स्फोट झाला. त्यात पाच कामगारांचा मृत्यू झाला तर सात जण गंभीर जखमी झाले. स्फोट झाल्याची माहिती मिळताच गंगाधर आणि शकुंतला निहारे हे दोघेही लगबगीने कंपनीकडे निघाले. थेट कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ गेल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अडविले. दोघांनी मुलगा निखिलबाबत चौकशी केली. मात्र, कुणीही माहिती देत नव्हते. काही कामगार जखमी असल्याचे सांगितल्यामुळे मुलगी जखमी असल्याचे वाटत होते. त्यामुधे गंगाधर आणि शकुंतला हे दोघेही कंपनीच्या दाराकडे डोळे लावून रात्रभर बसले होते. मुलगा काही वेळात येईल, अशी आशा होती. मात्र, सकाळ झाली तरीही मुलगा सापडला नाही. पोलीस आणि कंपनीचे अधिकारी ‘शोध सुरु आहे’ एवढेच उत्तर देत होते. त्यामुळे वृद्ध मायबापाचा जीव कासाविस होत होता. शेवटी दुसऱ्या दिवशी मुलाचा मृतदेहच कंपनीच्या बाहेर आला. वृद्ध मायबापाने कंपनीच्या प्रवेशद्वारासमोरच हंबरडा फोडला आणि रुग्णालय गाठले.  

निखिलसाठी लग्नाचे स्थळ शोधणे सुरु होते

शकुंतला यांना वृद्धपकाळामुळे घरातील काम होत नव्हते. मुलाचे लग्नाचे वय झाल्यामुळे आ‌ईवडिलांनी निखिलसाठी स्थळ बघणे सुरु केले होते. काही नातेवाईकांनी काही स्थळेसुद्धा सुचवले होेते. यावर्षी निखिलचे शुभमंगल करण्याचे ठरविले होते. मात्र, काळाला काही औरच मान्य होते. वृद्ध पित्यावर आता युवा मुलाचे अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे.