भंडारा : ‘आयुष्यभर कष्ट केले, कुटुंबासाठी राब राब राबलो , आता सेवानिवृत्त झालो की निवांत वेळ घालवायचा आणि आनंदाने आयुष्य जगायचे’ सहकारी मित्रासोबत कायम याच चर्चा करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचे सेवानिवृत्तीनंतरचे स्वप्न क्षणात ढिगाऱ्याखाली गाडले गेले. आयुध निर्माणीतील स्फोटात जीव गमावणारे ज्युनिअर वर्क्स मॅनेजर चंद्रशेखर गोस्वामी यांच्या सेवानिवृत्तीची चार महिने शिल्लक असताना ही दुर्दैवी घटना घडली.
जवाहरनगर आयुध निर्माणीतील ‘लो टेम्परेचर प्लास्टिक एक्सप्लोसिव्ह’ हा अती संवेदनशील विभाग आहे. या विभागात आरडीएक्सपासून ‘कार्टेजिंग’ तयार केले जाते. सकाळच्या पाळीत साधारणतः १३ जण काम करीत होते. सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास हे सर्व कामावर रूजू झाले. ८.३० वाजता सर्व कामाला लागले. मात्र दोन तासानंतर कुणाला काहीही कळायच्या आतच कानठळ्या बसवणारा जोरदार आवाज झाला. पळापळ सुरू झाली. आयुध निर्माणीत स्फोट झाल्याचे वृत्त समाज माध्यमांवर व्हायरल होऊ लागले. नेमक्या कुठल्या विभागात हे घडले याविषयीची माहिती नसल्याने कुटुंबीयांची काळजी वाढली. सकाळी ६ आणि ९ वाजता कामावर गेलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांकडून नेमक्या माहितीचा शोध घेणे सुरू झाले. परगावी असलेल्या नातेवाइकांकडूनही विचारणा सुरू झाली. घटनेच्या साधारण तासभराहून अधिक काळापर्यंत आयुध निर्माणीतील कर्मचाऱ्यांच्या घरातील फोन वाजत होते. आपले कुणी नाही, याचा शोध घेत होते.
एलटीपीई विभागात स्फोट झाल्याचे कळताच अनेकांनी त्या दिशेने धाव घेतली. मात्र मुख्य द्वार बंद झाल्याने आत काय झाले हे बाहेरच्या कुणालाही कळत नव्हते. रुग्णवाहिकांच्या सायरनच्या आवाजाने संपूर्ण परिसर भेदरलेल्या होता. त्यातच घटनास्थळावरून रुग्णवाहिकेत जखमींना आणले जात होते. अगदी सुरवातीच्या टप्प्यात ज्युनिअर वर्क्स मॅनेजर चंद्रशेखर गोस्वामी यांना अत्यंत गंभीर अवस्थेत आयुध निर्माण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना ताबडतोब भंडारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मृत्यूशी झुंज संपली आणि गोस्वामी गतप्राण झाले. कुटुंबीयांना त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.
चंद्रशेखर गोस्वामी हे घरातले कर्तेधर्ते. त्यांना दोन मुले आहेत. एक खाजगी कंपनीत नोकरी करतो तर दुसरा बेरोजगार आहे. गोस्वामी हे मे महिन्यात सेवानिवृत्त होणार होते. त्यामुळे सेवानिवृत्त झाल्यानंतर निवांत आयुष्य जगायचं असे ते बोलून दाखवत असत. मात्र त्यांचे त्यांच्या सोबत त्यांची स्वप्ने ही मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. ज्या कारखान्यात आयुष्भर रक्ताचे पाणी करून काम केले त्याच कारखान्यात गोस्वामी यांना अखेरचा श्वास सोडला. त्यांच्या मृत्यूचे वृत्त कळताच संपूर्ण परिसर शोकमग्न झाला.