लोकसत्‍ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरावती : येथील मध्‍यवर्ती कारागृहात स्‍फोटक पदार्थांनी भरलेला चेंडू आढळल्‍याने खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री उशिरा मध्‍यवर्ती कारागृहाच्‍या परिसरात फटाका फुटल्‍याचा आवाज आल्‍याने कारागृहातील कर्मचाऱ्यांनी त्‍या दिशेने धाव घेतली, तेव्‍हा त्‍यांना एक चेंडू दिसून आला. त्‍यात स्‍फोटक पदार्थ भरलेले होते. या घटनेनंतर कारागृह परिसरात सुरक्षा व्यवस्‍था वाढविण्‍यात आली असून हा प्रकार घडवून आणणाऱ्यांचा शोध घेण्‍यात येत आहे.

अमरावती मध्‍यवर्ती कारागृहात यापुर्वी चेंडूमधून गांजा आणि इतर साहित्‍य फेकण्‍यात आल्‍याच्‍या घटना उघडकीस आल्‍या आहेत. कारागृहातील कैद्यांना गांजा पुरविण्‍यासाठी मध्‍यवर्ती कारागृहालगतच्‍या नवीन बायपास मार्गावरून हे चेंडू फेकले गेले होते. कारागृहाची एक भिंत ही बायपास मार्गाला लागून आहे. याच भागातून हे स्‍फोटके भरलेले चेंडू फेकण्‍यात आले असावे, असा कयास व्‍यक्‍त केला जात आहे.

आणखी वाचा-उत्तम उपचारामुळे ‘एम्स’कडे ओढा वाढला.. मूत्रपिंडानंतर हृदय, यकृत प्रत्यारोपणही…

अमरावती मध्‍यवर्ती कारागृहात बाराशेहून अधिक कैदी आहेत. यात सिद्धदोष आणि न्‍यायाधीन कैद्यांचा समावेश आहे. राज्‍यातील विविध भागातील कैदी देखील या ठिकाणी आहेत. शनिवारी रात्री कारागृहाच्‍या परिसरात मोठा फटका फुटल्‍यासारखा आवाज झाला. कारागृहात कार्यरत कर्मचाऱ्यांनी कारागृहाच्‍या मैदानात धाव घेतली. त्‍यावेळी त्‍यांना एक चेंडू दिसून आला. मात्र, हा प्रकार संशयास्‍पद वाटल्‍याने कारागृहातील कर्मचाऱ्यांनी शहर पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती कळताच पोलीस आयुक्‍त नवीनचंद्र रेड्डी यांच्‍यासह पोलीस उपायुक्‍त आणि इतर पोलीस कर्मचारी सोबतच बॉम्‍बशोधक व नाशक पथक घटनास्‍थळी पोहोचले. यावेळी बॉम्‍बशोधन व नाशक पथकाने स्‍फोटक पदार्थांनी भरलेला चेंडू निकामी केला. या चेंडूत बारूद आणि इतर स्‍फोटक पदार्थ असल्‍याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

काही फटाका विक्रेत्‍यांकडे बारूद भरलेले चेंडू (फटाके) विक्रीसाठी उपलब्‍ध आहेत. त्‍यापैकीच हे असावेत, हा प्रकार नेमका कुणी आणि कशासाठी केला, याबाबत आम्‍ही तपास सुरू केला आहे, अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्‍यात आली.

आणखी वाचा-नागपूर : हत्या केली, पिस्तूल कमरेला खोचले आणि रेल्वेने…..पुणेकर हत्याकांडातील थरार उघड….

मध्‍यवर्ती कारागृहात अमली पदार्थाने भरलेले चेंडू फेकण्‍याच्‍या अनेक घटना यापुर्वी निदर्शनास आल्‍या आहे. प्‍लास्टिक टेपने गुंडाळून हे चेंडू फेकण्‍यात येतात. या चेंडूत चक्‍क गोड सुपारी, चॉकलेट, काजळाची डबी, नागपुरी खर्रा आणि गांजासारखे पदार्थ आढळून आले आहेत. याप्रकरणी गुन्‍हे देखील दाखल करण्‍यात आले आहेत, पण आरोपींचा शोध लागलेला नाही. त्‍यातच आता स्‍फोटकांनी भरलेले चेंडू फेकण्‍यात आल्‍याने कारागृहातील सुरक्षेविषयी प्रश्‍नचिन्‍ह उपस्थित केले जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explosives found in balls in amravati jail mma 73 mrj
Show comments