गोंदिया : गेल्या आठवडाभरापासून हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस आणि मेल गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले आहेत. या मार्गावरील महत्त्वपूर्ण अशा हावडा-पुणे (आझाद हिंद एक्स्प्रेस), समता एक्स्प्रेस आणि एल.टी. (लोकमान्य टिळक) एक्सप्रेस आठ ते दहा तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांना त्रास होत आहे. प्रवाशांना रेल्वे स्थानकावर भर थंडीत गाड्यांची वाट पाहात रात्र काढावी लागत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गत तीन महिन्यांपासून हावडा-मुंबई मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक सुरळीत होते. मात्र गेल्या आठवड्यापासून या मार्गावरील एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे बिघडले आहे. आझाद हिंद एक्स्प्रेस, समता एक्स्प्रेस आणि एल.टी. एक्सप्रेस आठ ते दहा तास उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांना नियोजित ठिकाणी पोहोचण्यास विलंब होत आहे.

हेही वाचा…व्हिडिओ: अत्यंत विषारी मण्यार सापांची थरकाप उडवणारी झुंज

डिसेंबर महिन्याच्या कडाक्याच्या थंडीत रेल्वे स्थानकावर रेल्वेची वाट पाहात प्रवासी रात्र काढत आहेत. या नियोजना मुळे प्रवाशांमध्ये रेल्वे प्रशासनाप्रती रोष व्यक्त होत आहे. एक्सप्रेस आणि मेल गाड्या थांबवून मालगाड्या सोडण्यास रेल्वे विभाग प्राधान्य देत होते. त्यामुळे प्रवाशांचा असंतोष लक्षात घेऊन रेल्वे बोर्डाने त्यात सुधारणा केल्या होत्या. मात्र गेल्या आठ-दहा दिवसांपासून तेच धोरण पुन्हा लागू होताना दिसत आहे. याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागत आहे. करिता मालगाड्यांना थांबवून प्रवासी गाड्यांना आधी सोडण्याचे धोरण रेल्वे विभागाने परत अवलंब करावे अशी मागणी गोंदियातील प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गोंदिया रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर यांना केली आहे.

हेही वाचा…अविवाहित मुलीला वडिलांकडून पोटगी मिळू शकते? न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय….

गोंदिया-बल्लारशाह एकेरी मार्गावरही समस्या

गोंदिया-बल्लारशाह आणि गोंदिया बालाघाट तिरोडी या एकेरी मार्गावरही प्रवाशांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. या मार्गावर मालगाड्या आणि एक्सप्रेस गाड्यांची संख्या वाढल्याने काही रेल्वे स्थानकावर तीन-चार तास प्रवासी गाड्या थांबविण्यात येत आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गोंदिया बालाघाट मार्ग वरील काटी- बिरसोला आणि हट्टा या स्थानकावर गोंदिया बालाघाट मेमू या लोकल गाड्यांना बहुतांश दा दोन दोन तीन तास थांबवून ठेवण्यात येत असल्यामुळे या गावातून कामानिमित्त आणि रोजगाराच्या निमित्ताने गोंदिया स्थानकात येत असलेल्या प्रवाशांना पण नाहक त्रास सहन करावा लागतो.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Express and mail train schedules have been disrupted at gondia station on howrah mumbai route sar 75 sud 02