लोकसत्ता टीम
वर्धा: सामाजिक न्याय विभागातर्फे दरवर्षी अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील ७५ विद्यार्थ्यांना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेतून शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. या योजनेसाठी अर्ज करण्यास वीस जून ही मुदत होती. ती आता ५ जुलै पर्यंत वाढविण्यात आली आहे. पदव्यूत्तर पदवी व पी एच डी चे विशेष अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत करण्याचा हेतू आहे.
पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाडे, परदेशातील शैक्षणिक संस्थेचे शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता,आकस्मिक खर्चाचा लाभ मिळेल. पदव्यूत्तर अभ्यासक्रमासाठी ३५ वर्ष व पी एच डी साठी ४० वर्ष ही कमाल मर्यादा आहे. विद्यार्थ्यांनी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरील रोजगार या लिंक वरून अर्ज डाऊनलोड करायचा आहे.
५ जुलै पर्यंत आवश्यक त्या कागदपत्रांसह समाज कल्याण आयुक्तालय पुणे या पत्त्यावर तो पाठविण्याची सूचना आहे.अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.