लोकसत्ता टीम
नागपूर : वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आऊटर रिंग रोडवर अंधारात कार उभी करून एक युवक विवाहित महिलेसोबत अश्लील चाळे करीत होता. दरम्यान कळमना पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन वादग्रस्त पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना पकडले. त्यांना पैशाची मागणी केली. दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या युवकाच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोनसाखळी हिसकावून घेऊन सोडून दिले.
युवकाने वाठोडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर लुटमार केल्याचा गुन्हा दाखल केला. पंकज यादव आणि संदीप यादव अशी आरोपी कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या घटनेमुळे नागपूर पोलीस खात्याची प्रतिमा मलीन झाली आहे. ‘सदरक्षणाय : खलनिग्रहणाय’ असे ब्रीदवाक्य असलेल्या पोलीस विभागाकडून सामान्यांना सुरक्षेची हमी हवी असते. मात्र, नागपूर पोलीस दलातील कर्मचारी सुरक्षेऐवजी चक्क लुटमार करीत असल्याचे समोर आले आहे.
आणखी वाचा-नागपूर : वर्गात एकट्या विद्यार्थिनीला पाहून शिक्षकाने…
गणेशपेठमधील गोदरेज आनंदम इमारतीत राहणारा एक युवक हा १३ एप्रिलला एका विवाहित महिलेला कारमध्ये घेऊन गेला. दोघेही वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आऊटर रिंगरोडवर एफएलडी हॉटेलच्या विरुद्ध बाजुला नेले. रस्त्याच्या कडेला कारमधील लाईट बंद करून महिलेसोबत अश्लील चाळे करीत होता. यादरम्यान, कळमना ठाण्यातील पोलीस कर्मचारी पंकज यादव आणि संदीप यादव हे अशाच प्रेमी युगुलांची लुटमार करण्यासाठी फिरत होते.
त्यांना एका अलीशान कारमध्ये एका विवाहित महिलेसोबत युवक अश्लील चाळे करीत असल्याचे दिसून आले. त्यांनी लगेच दोघांनाही बाहेर काढले. युवकावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी महिलेला दिली. तसेच महिलेच्या कुटुंबियांनाही पोलीस ठाण्यात बोलवून बदनामी करण्याची धमकी दिली. त्यामुळे विवाहित असलेली महिला घाबरली. दोन्ही पोलिसांना महिलेला कुटुंब आणि संसार उद्धवस्त होण्याची भीती दाखवली. त्यामुळे ती गयावया करून पोलिसांना सोडून देण्याची विनंती करीत होती. त्यामुळे पंकज आणि संदीपने त्यांना पैसे मागितले.
आणखी वाचा-यवतमाळमध्ये ‘वंचित’चे बळ नवख्या पक्षाच्या उमेदवारास
मात्र, त्यावेळी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे दोन्ही पोलिसांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राची मागणी केली. त्यानंतर युवकाच्या गळ्यातील तीन तोळ्यांची सोनसाखळीची मागणी केली. न दिल्यास बदनामी आणि पोलीस ठाण्यात संपूर्ण कुटुंबाला बोलाविण्याची धमकी दिली. पोलिसांनी युवकाच्या गळ्यातील सोनसाखळी बळजबरीने हिसकावली आणि त्यांना सोडून दिले. त्या युवकाने महिलेला तिच्या घरी सोडले आणि थेट वाठोडा पोलीस ठाण्यात पोहचला. त्याने लेखी तक्रार दिली. पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने शोध घेऊन पोलीस कर्मचारी पंकज यादव आणि संदीप यादव यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आयुक्तांच्या कारवाईकडे लक्ष
पंकज आणि संदीप यादव हे वादग्रस्त कर्मचारी असून ते पूर्वी रेती तस्करांकडून पैसे घेत होते. दोघांवरही कळमना ठाणेदाराने कारवाई केल्यानंतर ते दुसऱ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत लुटमार करीत होते. रात्रीच्या सुमारास रस्त्यावरील प्रेमी युगुलांना दमदाटी करून लुटमार करून पैसे कमवित होते. दोन्ही कर्मचाऱ्यांमुळे पोलीस खात्याची प्रतिमा डागाळली. त्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल हे दोन्ही कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.