सायबर गुन्हेगारांनी ‘ऑनलाईन गेम’ खेळणाऱ्या मुलांना लक्ष्य केले असून शहरातील एका महिलेच्या ११ वर्षीय मुलाला जाळ्यात ओढले.आईच्या खात्यातून एक लाख २ हजार रुपये पाठवण्यास सांगितले. पैसे न पाठवल्यास बहिणीचे अपहरण करण्याची धमकी दिली. भीतीपोटी मुलाने सायबर गुन्हेगारांच्या खात्यात पैसे पाठवले. या खळबळजनक घटनेमुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत.
कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्फिया नदीम शेख (३३, वेलकमनगर, कोराडी) या ‘युट्यूबर’ असून त्यांना ११ वर्षांचा मुलगा व दोन वर्षांची मुलगी आहे. त्यांच्या मुलाला मोबाईलवर ‘फ्री फायर’ हा ‘ऑनलाईन गेम’ खेळण्याची सवय आहे. यामध्ये स्व:सह अन्य साथीदारही खेळ खेळू शकतात.
हेही वाचा >>>“कुशल मनुष्यबळ निर्मिती ही शिक्षण क्षेत्राची जबाबदारी”, उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणतात..
२० मार्चला फ्री फायर गेममध्ये एस.के. भाईजान, प्रमोद कालू, अक्षद व दीपक बोरा हे देखील सहभागी झाले. त्यांनी मुलाला संदेश पाठवून जाळ्यात ओढले. त्याच्या घरातील सदस्यांबाबत माहिती मिळवली. आरोपींनी त्याला आईच्या एटीएमचा ‘पासवर्ड’ पाहण्यास सांगितले. मोठ्या शिताफीने त्यांनी पासवर्ड प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने पासवर्ड सांगण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपींनी बहिणीचे अपहरण करण्याची धमकी दिली. त्याने आईच्या मोबाईलवरून २० मार्च ते ६ एप्रिल या कालावधीत १ लाख २ हजार रुपये आरोपींच्या खात्यात वळते केले. हा प्रकार समोर आल्यानंतर अल्फिया शेख यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली.