भंडारा : आयुध निर्माण जवाहरनगर कंपनीच्या एलपीटीई सेक्टरमध्ये दिवस पाळीत काम करणारे कामगार आणि कर्मचारी सकाळी ७.३० वाजता सेक्टरमध्ये पोहोचले. साधारण साडे आठ वाचता पंचींग करून सगळे कर्मचारी कामाला लागले. हा विभाग अती संवेदनशील असल्याने रोजच्या प्रमाणे अत्यंत सावधगिरीने सर्वजण आपले काम करत होते. मात्र दोनच तासात होत्याचे नव्हते झाले. एलपीटीई २३ सेक्टरमध्ये अचानक जोरदार स्फोट झाला. या स्फोटामुळे जमिनीत मोठा खड्डा पडला आणि एलपीटीईची अख्खी ईमारत एका क्षणात या खड्ड्यात सामावली. या सेक्टरमध्ये काम करणारे कामगार आणि कर्मचारी मलब्यखाली दबले गेले. मात्र एका तासानंतरही मलब्याखाली दबलेल्या कामगारांचा आवाज येत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जीवाच्या आकांताने हे कामगार ‘मी इथे आहे, मला बाहेर काढा,’ असे सांगत होते. त्यांच्या आवाजाच्या दिशेने त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात होते. मात्र तासाभरानंतर हे आवाज येणे बंद झाले.
भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माणी विभाग, जवाहर नगर (ठाणा) येथे २४ जानेवारी रोजी सकाळी १०.४५ मिनीटांनी जोरदार स्फोट होऊन एलपीटीई २३ ही इमारत धारातीर्थी झाली. या घटनेत आतापर्यंत पाच जणांचा दुर्दैवी मृत्युमुखी झाला असून मलब्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे कार्य अजूनही सुरू आहे. या दुर्दैवी घटनेत चंद्रशेखर गोस्वामी ५९ वर्षे, मनोज मेश्राम ५५ वर्षे , अजय नागदेवे ५१ वर्षे अंकित बारई २०, अभिषेक चौरसिया यांचा मृत्यू झाला असून एन पी वंजारी ५५, संजय राऊत ५९, राजेश बडवाईक ३३, सुनील कुमार यादव २४, जयदीप बॅनर्जी ४२ या जखमींना बाहेर काढण्यात यश आले आहे. उर्वरित व्यक्तींचा शोध घेणे सुरू आहे.
हा स्फोट इतका भयंकर होता जवाहर नगर परिसरात असलेल्या वसाहतीत अनेकांच्या घराच्या भिंतींना भेगा पडल्या, कुठे फर्शीचे तुकडे झाले तर कुठे स्वयंपाक खोलीतील टाईल्स फुटल्या. स्फोटानंतर सायरन वाजताच आयुध निर्माण वसाहतीतील अनेकांनी घराबाहेर पळ काढला. तर काहींनी थेट रुग्णालयाकडे धाव घेतली. एलपीटीई विभागात स्फोट झाल्याची माहिती वाऱ्याप्रमाणे पसरली आणि सर्वांनी तिकडे धाव घेण्यास सुरुवात केली. मात्र त्याचवेळी त्या विभागाकडे जाणारे मुख्यद्वार बंद करण्यात आले. त्यामुळे तेथे अडकलेल्या लोकांबद्दल माहिती मिळत नसल्याने लोकांनी आयुध निर्माण रुग्णालयासमोर एकच गर्दी केली. आपल्या घरातील व्यक्ती सुखरूप आहे किंवा नाही या विचाराने त्यांच्या काळजाचा ठोका चुकू लागला. माहिती घेण्यासाठी कुटुंबीयांची धावपळ सुरू होती. आतून माहिती मिळताच कुणाचा जीव भांड्यात पडत होता तर कुणी हंबरडा फोडत होते. अत्यंत विदारक दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळू लागले.
मागील ५० ते ६० वर्षात असा स्फोट झालेला नाही असे तेथील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. घटनास्थळाहून परत आलेल्या एक कर्मचाऱ्याने सांगितले की स्फोट झाल्यानंतर मलब्यखाली दबलेल्या लोकांना काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. मात्र त्यात अनेक अडचणी येत होत्या. स्फोटाच्या आवाजाची तीव्रता इतकी जास्त होती की काही कर्मचाऱ्यांच्या कानातून रक्त निघू लागले तर काहींचे शरीराचे काही भाग भाजले गेले. स्फोटानंतर कामाच्या ठिकाणी असलेले साहित्य, लोखंडी पत्रे, ट्रॉली अशा अनेक साहित्यांच्या अक्षरशः तुकडे तुकडे झाले आणि ते सुमारे ४०० ते ५०० मीटर अंतरावर फेकले गेले. त्यामुळे अनेक जण त्यामुळेही जखमी झाले. मलब्यखाली दबलेल्या लोकांपैकी अनेकांचे आवाज तासभर ऐकू येत होते. जीव वाचविण्यासाठी ते मदतीचा हात मागत होते. अंगावर सिमेंट काँक्रिटचां मलबा आणि नाकातोंडात गेलेला विषारी धूर यामुळे हळूहळू हे आवाज मंदावले आणि नंतर आवाज येणे बंद झाले.