भंडारा : उमरेड करंडला अभयारण्यातील एफ-२ या वाघिणीने पर्यटकांना भुरळ घातली आहे. एफ-२ वाघीण आणि तिचे पाच बछड्यांचे पर्यटकांना दर्शन होत असल्यानं पर्यटक सुखावले आहेत. त्यांचे अनेक व्हिडिओही यापूर्वी व्हायरल झाले आहेत.
आता आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये हे पाचही बछडे एफ-२ वाघिणीसोबत मॉर्निंग वॉकसाठी निघाले असून मार्गावर मस्ती करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पेंच येथील कौशल नेवारे यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.
मातृत्वाची सुखद अनुभूती फक्त माणसेच अनुभवतात असे नाही, किंबहुना अधिक जास्त ती प्राण्यांमध्ये दिसून येते. वाघांबाबत बोलायचे तर दोन वर्षांपर्यंत हे बछडे वाघिणीसोबतच राहतात. या कालावधीत ती त्यांना खाऊ घालण्यापासून तर शिकार करण्याचे प्रशिक्षण देते. यादरम्यान मातृत्त्वाचा सोहोळा त्यांच्यातही रंगलेला दिसून येतो.
असाच एक अविस्मरणीय प्रसंग उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात पर्यटकांनी अनुभवला. ‘एफ २’ ही वाघीण तिच्या सहा महिन्यांच्या दोन बछड्यांसह त्यांच्या नैसर्गिक अधिवासाची भ्रमंती करताना दिसून आली. दरम्यान भ्रमंती मार्गावर बछड्याची आईसोबत मस्ती सुरू होती. हा व्हिडीओ २५ फेब्रुवारी रोजी उमरेड पवनी करंडला अभयारण्यतील गोठणगाव सफारी दरम्यान सकाळी काढला गेला.
गोठणगाव सफारी गेटला “एफ२” वाघीण सकाळी ८.३० वाजता दरम्यान आपल्या ६ महिन्यांच्या ५ बछड्यांना सोबत घेऊन भ्रमंतीला निघाली असता हे मनमोहक दृश्य नेवारे यांनी टिपले. हे पाचही बछडे आपल्या आईच्या जवळ घुटमळत आहेत. कुणी ‘आई आहे तर काय भीती ‘ अशा अविर्भावात काही काळ भ्रमंती मार्गावर विसावले तर काही बछडे एफ २ वाघिणीच्या अवती भोवती फिरत आहेत.
एक बछडा तर स्वतःचा लाड करवून घेण्यासाठी जणू तिच्या जवळ जवळ लाडवतो आहे. मुक्या जनावरांमध्ये सुद्धा किती ममता असते याची प्रचिती करून देणारा हा व्हिडिओ आहे. अवघ्या ६ महिन्यांच्या बछड्यांना खुल्या जंगलात पर्यटकांसमोर आणण्याचे धाडस ताडोबाच्या माया वाघिणी नंतर आता गोठणगावची एफ-२ वाघीण करत आहे.
उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य काही वर्षांपूर्वी ‘जय’ असे नामकरण झालेल्या वाघाने प्रसिद्धीस आणले होते. तो गेला आणि काही काळ या अभयारण्याची रया गेली. दरम्यानच्या काळात ‘चांदी’, ‘फेअरी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वाघिणींनी पुन्हा एकदा या अभयारण्याला वलय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.
अभयारण्य परिसरातील गोठणगाव प्रवेशद्वार क्षेत्र हाच अधिवास असणाऱ्या ‘फेअरी’ आणि तिच्या पाच बछड्यांनी पुन्हा पर्यटकांना ओढ लावली. ते मोठे झाले आणि त्यांनी आपला नवा अधिवास शोधला. त्यानंतर हे अभयारण्य पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या वलयातून बाहेर पडले.
अलीकडच्या वर्षभरात पर्यटकांचा मोर्चा पुन्हा या अभयारण्याकडे वळला आहे, कारण येथे सहजपणे होणारे व्याघ्रदर्शन. मागील वर्ष भरापासून ‘एफ २’ या वाघिणीने तिच्या चिमुकल्या बछड्यांसह अभयारण्यात सहजपणे भ्रमंती सुरू केली आण पर्यटकांना आकर्षित करू लागली. उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात सफारीसाठी पर्यटकांची पहिली पसंती गोठणगाव प्रवेशद्वार आहे.
कारण ‘एफ २’ वाघीण आणि तिचे बछडे. त्यामुळे ‘फेअरी’ व तिच्या पाच बछड्यांनी प्रसिद्ध केलेल्या या प्रवेशद्वाराचा वारसा आता ‘एफ २’ ही वाघीण आणि तिचे दोन बछडे पुढे चालवत आहेत. या बछड्यांच्या जन्मानंतरही ती बरेचदा बछड्यांना तोंडात घेऊन इकडून तिकडे जाताना दिसायची, पण ते क्वचितच. आता मात्र ती सहजपणे पर्यटकांना दर्शन देत आहे.