नागपूर: एसटीतून प्रवास करताना प्रवाशांना आता तिकिटासाठी सुट्ट्या पैशांची चिंता करण्याची गरज नाही. एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत प्रवाशांना ‘युपीआय’ प्रणालीद्वारे तिकीट खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. त्याला प्रवाश्यांकडून प्रतिसादही वाढत आहे.
एसटी महामंडळाने सर्व वाहकांसाठी अँड्रॉइड तिकीट इश्यू मशिन्स (ईटीआयएम) नव्याने सेवेत दाखल केल्या आहेत. या मशिनमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान रोख पैशांऐवजी युपीआय, क्युआर कोड, आदी डिजिटल पेमेंटचा वापर करत तिकीट काढता येते. जानेवारी- २०२४ ते मे- २०२४ अखेर १४ लाख ३२ हजार तिकिटांची विक्री झाली. त्यातून एसटीला ५ महिन्यांत ३५ कोटी ८७ लाख १५ हजार रुपयांचा महसूल मिळाला.
हेही वाचा – लिपिक टंकलेखक, कर सहायक पदासाठी कौशल्य टंकलेखन चाचणीची तारीख जाहीर
एसटीचा व्यवहारही रोखरहित करण्याच्या दिशेने पाऊल टाकत एसटीने प्रवाश्यांनाही धावत्या बसमध्ये तिकीट काढण्यासाठी फोन पे, गुगल पे या सारख्या युपीआय पेमेंटची सुविधा उपलब्ध केली आहे. वाहकाच्या अँड्रॉइड तिकीट मशीनवर असलेल्या क्युआर कोडद्वारे प्रवाशांना तिकिटाचे मोजके पैसे डिजिटल स्वरुपात देणे शक्य आहे. अर्थात, प्रवाशांना या सुविधेमुळे खिशात रोख पैसे नाहीत तसेच, सुट्या पैशासाठी वाहकासोबत होणारा वाद असे प्रश्न कायमचे मिटले आहेत. या सहज आणि सुलभ तिकीट प्रणालीला प्रवाशांनी भरघोस प्रतिसाद दिला असून जानेवारी २०२४ मध्ये प्रतिदिन केवळ ३ हजार ५०० तिकिटे युपीआयव्दारे काढली जात होती. त्यामध्ये मे, २०२४ मध्ये पाचपट वाढ होऊन प्रतिदिन २० हजार ४०० तिकिटे सरासरी काढली जात आहेत. अर्थात, युपीआय पेमेंटव्दारे महामंडळाच्या खात्यावर पैसे जमा होण्याचे प्रमाण देखील वाढले असून ते जानेवारी २०२४ मध्ये प्रतिदिन १० लाख रुपये होते, आता मे, २०२४ मध्ये ४५ लाख रुपये प्रतिदिन झाले आहे.
वाद टाळायचे, युपीआय तिकीटाची मागणी करा
प्रवाशांनी प्रवासादरम्यान नेहमी वाहकाकडे युपीआय तिकीटाची मागणी करावी जेणेकरून सुट्ट्या पैशावरून होणारे वादविवाद टाळले जातील. युपीआय पेमेंटव्दारे क्युआर कोडच्या माध्यमातून एसटीच्या सर्व प्रकारच्या बस सेवेमध्ये तिकीट विक्री सुरू केली असून जास्तीत जास्त प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
एसटीत युपीआयद्वारे झालेला व्यवहार व महसूल
……………………………………………………………………..
महिना – तिकीट संख्या – उत्पन्न (लाखात)
………………………………………………………………………
जानेवारी- २०२४ – १०९४९६ – ३,१२,८७,२७७
फेब्रुवारी- २०२४ – १३३१५७ – ४,१०,७०,९४१
मार्च- २०२४ – २०५९६१ – ५,८६,५०,७८७
एप्रिल- २०२४ – ३५०७३६ – ८,७५,२३,९१०
मे- २०२४ – ६३२६९० – १४,०१,८२,७०७
………………………………………………………………………..
एकूण – १४३२०४० – ३५,८७,१५,६२२