|| देवेश गोंडाणे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : ‘म्हाडा’ व ‘टीईटी’ परीक्षेतील गैरव्यवहाराचा सूत्रधार आणि जी.ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीचा संचालक डॉ. प्रीतीश देशमुख याला अनेक राजकीय नेत्यांचा आशीर्वाद असल्याची माहिती समोर येत आहे. या बळावरच त्याने अल्पावधीतच कंपनीला कोट्यवधी रुपयांचे कंत्राट मिळवून दिल्याने कंपनीने त्याची महाराष्ट्राच्या संचालकपदी नियुक्ती केली होती. विशेष म्हणजे, डॉ. प्रीतीश देशमुखने नुकतीच एका मोठ्या राजकीय नेत्याच्या स्वीय सहाय्यकाला मर्सडीज बेंझ गाडी घेऊन दिल्याचीही चर्चा आहे.

डॉ. प्रीतीश देशमुख हा मूळचा वर्धा येथील असून त्याने नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेतले होते. मात्र, वैद्यकीय क्षेत्रात  न जाता राजकीय संबंधांचा वापर करून तो बंगळुरू येथील जी.ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या कंपनीशी जुळला. जी.ए. सॉफ्टवेअर ही नवउद्योजकांनी स्थापन केलेली एक कंपनी आहे. या कंपनीशी जुळताच  प्रीतीशने राजकीय वशिल्याचा वापर करून कंपनीला अनेक सरकारी कंत्राट मिळवून दिले. या कंत्राटामुळे अल्पावधीतच नव्याने स्थापन झालेल्या या कंपनीचीही आर्थिक बाजू भक्कम झाली. त्यामुळे कंपनीने प्रीतीशला कंपनीचा महाराष्ट्राचा संचालक म्हणून नियुक्त केले. संचालकपदी रूजू होताच प्रीतीशच्या अपेक्षा  उंचावल्याने त्याने सरळसेवा भरतीच्या सर्व मोठ्या परीक्षांचे कंत्राट आपल्यालाच मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केले. मुळात सरळसेवा भरतीसाठी महाआयटीने चार कंपन्यांची निवड केली आहे. यातील कुठल्याही एका कंपनीकडून परीक्षा घेण्याचा अधिकार हा संबंधित विभागाला आहे. त्यामुळे ज्या विभागाची परीक्षा असेल त्या पक्षाच्या बड्या राजकीय नेत्यांशी किंवा त्यांच्या स्वीय सहाय्यकांशी बोलणी करून प्रीतीश हे कंत्राट आपल्या कंपनीकडे खेचून आणत असे. यातूनच जी.ए. सॉफ्टवेअरला आधी टीईटी आणि आता ‘म्हाडा’च्या भरतीचे कोट्यवधी रुपयांचे कंत्राट मिळाले होते. यासाठी एका नेत्याच्या स्वीय सहाय्यकाला मर्सडीज बेंझ गाडी घेऊन दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासात पुढे अनेक गूढ उलघडण्याची शक्यता आहे.

विनर कंपनीलाही कंत्राट

या प्रकरणात आता ‘विनर सॉफ्टवेअरचा’चा प्रमुख सौरभ त्रिपाठीला अटक करण्यात आली आहे. यंदा झालेली टीईटी परीक्षा या कंपनीने घेतली होती. टीईटी-२०२० परीक्षेत गोंधळ घातल्याचा जी.ए. सॉफ्टवेअरवर आधीच आरोप असल्याने या कंपनीला पुन्हा टीईटीचे कंत्राट मिळणे कठीण होते. त्यामुळे  प्रीतीश  याने याच कंपनीशी संबंधित सौरभ त्रिपाठीच्या विनर कंपनीला हे काम मिळवून दिले होते. यामुळे यंदाच्या टीईटी परीक्षेमध्येही गोंधळ होण्याची  शक्यता  आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Facilitator mhada tet exams g a software director of technology dr pritish deshmukh akp