अकोला : पशुवैद्यकीय आणि पशू विज्ञान पदवी महाविद्यालय सुरू करण्यासाठी भारतीय पशुवैद्यकीय परिषदेने (व्हीसीआय) मंजुरीची मोहर उमटवली. यासंदर्भात परवानगी पत्र जारी करण्यात आले असून, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून पशुवैद्यकीय विज्ञान व पशुसंवर्धन पदवी अभ्यासक्रम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला.

दरवर्षी येथे ८० विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणार आहे. पश्चिम विदर्भ व मराठवाड्यातील भूमिपुत्रांना पशुवैद्यकीय आणि पशू विज्ञान पदवी घेण्याची मोठी सुविधा आता अकोल्यात निर्माण होणार आहे.

तत्कालीन महायुती सरकारच्या काळात २०१६ मध्ये पशुवैद्यकीय आणि पशू विज्ञान पदवी महाविद्यालय अकोल्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या महाविद्यालयाच्या इमारतीच्या उभारणीसाठी ३७४ कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला होता. नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असून, ते पूर्ण होईपर्यंत पदव्युत्तर महाविद्यालयात प्रथम वर्षाची शिक्षण प्रक्रिया राबवली जाणार आहे. शैक्षणिक सुविधांच्या पूर्ततेच्या अटींसह केंद्र सरकारकडून मान्यता मिळाली असून, तिसऱ्या आणि चौथ्या अंतिम वर्षांसाठी आवश्यक अतिरिक्त सुविधा, मनुष्यबळाची पूर्तता करण्याच्या अटी घालण्यात आल्या आहेत. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून ८० विद्यार्थ्यांना दरवर्षी पशुवैद्यकीय विज्ञान व पशुसंवर्धन पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणार आहे. पशुवैद्यकीय आणि पशू विज्ञान पदवी महाविद्यालयासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने बाभूळगाव येथील जागा दिलेली आहे. त्या बदल्यात पशुवैद्यकीय आणि पशू विज्ञान महाविद्यालयाने बोरगाव येथील जागा विद्यापीठाला दिली. पश्चिम विदर्भासह मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना पदवी महाविद्यालयाचा मोठा लाभ होणार आहे.

पदव्युत्तर असताना पदवीची सुविधा नव्हती

अकोल्यात पशुवैद्यकीय आणि पशू विज्ञान पदव्युत्तर महाविद्यालय आहे, मात्र पदवीचे शिक्षण घेण्याची सुविधा नव्हती. विद्यार्थ्यांना नागपूर येथे पदवी शिक्षण घेण्यासाठी जावे लागत होते. हा मुद्दा लक्षात घेऊन अकोला पूर्वचे भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्यांच्या मागणीची दखल घेऊन तत्कालीन महायुती सरकारने अकोल्यात पदवी महाविद्यालय मंजूर केले. महाविद्यालयाच्या इमारतीसाठी निधी देखील मंजूर केला. त्यानंतर खासदार अनुप थोत्रे यांनी पदवी महाविद्यालय सुरू होण्यासाठी केंद्र सरकारस्तरावर पाठपुरावा करून मंजुरीसाठी प्रयत्न केले. केंद्रीय पशुपालन मंत्री लल्लनसिंग यांच्या सहकार्याने पशुवैद्यकीय पदवी शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला. भविष्यात पशुसंवर्धन क्षेत्राला चालना देण्यासाठी हे महाविद्यालय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Story img Loader