नागपूर: स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची आज जयंती. ११ एप्रिल १८२७ रोजी त्यांचा जन्म झाला. ज्योतिबा फुलेंनी सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन, आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी केले. आजच्या दिवशी ज्योतिबांचे थोर विचार जाणून घेणे आवश्यक ठरते. परंतु, यासोबतच ज्यांना मराठी रंगभूमीवरील महानायक म्हणून ओळख असतानाही सामाजिक कार्याचा वारसा हा महात्मा फुलेंकडून मिळाला, असे मराठीतील थोर अभिनेते दिवंगत निळू फुले यांचे आणि महात्मा फुले यांचे नाते संबंध काय हे जाणून घेणेही महत्त्वाचे ठरते.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

 महाराष्ट्राचे महानायक अशी ओळख असलेले ज्येष्ठ दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या अभिनयाची चर्चा आजही होते. लोकप्रियतेचे शिखर गाठलेल्या या दिग्गज अभिनेत्याचं कला क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातही मोठं कार्य आहे. व्यावसायिकतेच्या पलीकडं जात ते एक मानवी पातळीवर व्यवहार करणारे संवेदनशील कलावंत होते.

निळू फुले हे सुरुवातीपासूनच राष्ट्रसेवादलाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी होते. मेधा पाटकरांच्या आंदोलनापासून क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या कष्टक-यांच्या चळवळीपर्यंत त्यांनी स्वत:ला जोडून घेतलं होतं. निवडणुकीच्या काळात डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांच्या प्रचारासाठी जात होते.

ब्रिटिशकालीन पुण्यात शुक्रवार पेठेतल्या खडकमाळ अळीत १९३२ साली नीळकंठ कुष्णाजी फुले अर्थात निळू फुलेंचा जन्म झाला. फुले आडनावावरून नेहमीच सगळ्यांना प्रश्न पडायचा की, महात्मा फुलेंचे हे वंशज तर नाहीत ना? तर याच प्रश्नाचं उत्तर खुद्द निळू फुलेंनी एका मुलाखतीत दिले आहे. त्यांची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

या मुलाखतीत निळू फुले हे महात्मा फुले यांचे थेट वंशज असल्याचे सांगतात. महात्मा फुलेंचे खापर पणतू असल्याचं त्यांनी या जुन्या मुलाखतीत सांगितले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मुलाखतीत निळू फुलेंना विचारण्यात आले की, घरात प्रत्यक्षात तुम्हाला सत्यशोधकी वारसा आहे. हा म्हणजे तुम्ही फुले म्हणजे ओढून ताणून फुले नाहीत… यावर निळू फुले म्हणातात की, नाही मी ओढून ताणून नाही..महात्मा फुलेंचा खापर पणतू आहे …डायरेक्ट अगदी.

तीन चार पिढ्या आम्ही पुण्यात आलो. त्याच्या आधी ही त्यांच गाव आहे तिथं मंडळी राहत होते, आजही काहीजण आहेत. फुले जेव्हा पुण्यात राहायला आली, तेव्हापासून फुले मंडळी पुण्यात स्थायिक झाली.त्याच्यामधला मी. असे निळू फुले म्हणाले. तर निळू भाऊंचे थोरले बंधू १९४२ च्या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांनी येरवड्याच्या तुरूंगात कारावास सोसला होता. इतकंच नाही तर निळू फुले यांनी महात्मा गांधीनी अनेकदा पाहिले होते. तर साने गुरूजींच्या अनेक सभांमध्ये त्यांनी स्वयंसेवक म्हणून काम पाहिल होते. निळू फुलेंच्या मुलाखतीचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fact about legendary marathi actor nilu phule relation with mahatma jyotiba phule dag 87 zws