लोकसत्ता टीम
अमरावती : भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यापैकी धामणगाव मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे विद्यमान आमदार प्रताप अडसड यांना उमेदवारी मिळाली, तर अनपेक्षितपणे अचलपुरातून प्रवीण तायडे यांना उमेदवारी मिळाली. पण, जिल्ह्यातील इतर मतदारसंघांमध्ये उमेदवारी जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. अनेकांचे लक्ष बडनेरा मतदारसंघाकडे लागले आहे. बडनेरातून भाजपचे माजी नगरसेवक तुषार भारतीय यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. पण, महायुतीला पाठिंबा देणारे युवा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आमदार रवी राणा हे महायुतीच्या समर्थनाच्या प्रतीक्षेत आहेत.
दरम्यान, आपल्याला महायुतीचा पाठिंबा असून येत्या २९ ऑक्टोबरला आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे रवी राणा यांनी मंगळवारी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. माय-बाप जनता आपल्या पाठीशी आहे. सतत पाच वर्षे आपण जनतेत असतो. जनसेवेचे कार्य करीत असतो. त्यामुळे वेळेवर कॉर्नर मिटिंग किंवा सभा घेण्याची आपल्याला गरज पडत नाही. जनतेचा आपल्यावर विश्वास आहे. आपण याच बळावर निवडणुकीला सामोरे जात आहोत, असे रवी राणा म्हणाले.
आणखी वाचा-गजबजलेला चौक, वर्दळीचा रस्ता अन् विद्यार्थ्यांची घरी जाण्यासाठी घाई, न्यू इंग्लिश शलेसमोरील दृश्य…
रवी राणांच्या दाव्यामुळे तुषार भारतीय यांच्या गटातील कार्यकर्त्यांची अस्वस्थता वाढली आहे. भाजपची उमेदवारी तुषार भारतीय यांना मिळेल, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या भारतीय यांच्या समर्थकांना पक्षाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे, रवी राणा यांच्या विरोधात उभे ठाकणारे तुषार भारतीय यांनी आपला स्वर अधिक टोकदार केला आहे. नुकतेच बडनेरा विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्याला तुषार भारतीय यांनी संबोधित केले, यावेळी त्यांनी राणा दाम्पत्यावर जोरदार टीका केली होती.
आणखी वाचा-सावधान! ‘शेअर मार्केट’मध्ये पैसे गुंतवण्याचा बेत? आधी ही बातमी वाचा
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांच्या उमेदवारीला स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचा प्रचंड विरोध होता, अखेर या विरोधामुळे नवनीत राणा यांचा पराभव झाला. त्यामुळे आता नवनीत आमदार रवी राणा यांना देखील भाजपने समर्थन देऊ नये अशी मागणी स्थानिक भाजप कार्यकर्ते व नेत्यांनी केली आहे. त्यामुळे रवी राणा यांच्या समोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. अनेक वर्षांपासून भाजप बडनेरा मध्ये काम करत आहे. त्यामुळे उमेदवारी भाजपलाच मिळावी अशी मागणी तुषार भारतीय यांनी केली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी रवी राणा यांच्या विरोधात शिवसेनेच्या प्रिती बंड यांनी निवडणूक लढवली होती. त्यात रवी राणा यांनी बंड यांचा १५ हजार मतांनी पराभव केला होता.