चंद्रपूर : राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्ग ॲन्ड टेक्नॉलॉजी येथील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना मागील ७९ महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. २०१७-१८ ते २०२२-२३ या सहा वर्षांत महाविद्यालयाला शैक्षणिक शुल्कापोटी ११८ कोटी ३० लाख रुपये मिळाले. मात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन थकीतच आहे.
राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापक व कर्मचारी संघटनेचे पराग धनकर, सचिन वझलवार, देवनाथ तेलगोटे, धनंजय डुंबेरे, श्रीगडीवार यांनी ७९ महिन्यांचे वेतन थकीत असल्याची माहिती पत्रपरिषदेत दिली. गेल्या सहा महिन्यांपासून वेतनाचा एक पैसा मिळालेला नाही. २०१७ पासून वेतन अनियमित आहे. कधी ६० टक्के वेतन दिले जाते तर कधी दहा ते २५ हजार वेतन दिले जाते.
हेही वाचा – चंद्रपूर : तीन जणांचा बळी घेणारी वाघीण जेरबंद
वेतन कितीही दिले असो मात्र आयकर संपूर्ण वेतनावर भरला जात आहे. हे अभियांत्रिकी महाविद्यालय खासगी विनाअनुदानित तत्त्वावर असल्यामुळे वेतन आणि अन्य अनुषंगिक खर्च विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कातून केल्या जातो. खर्चाच्या अनुषंगाने शासनाची शिक्षण शुल्क समिती शैक्षणिक शुल्क निर्धारित करत असते. या शिक्षण शुल्कानुसार महाविद्यालयाला सहा वर्षांत ११८ कोटी ३० लाख रुपये मिळाले आहेत. तरीही प्राध्यापक व कर्मचारी यांचे वेतन दिले जात नाही. महाविद्यालयातील बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने जानेवारी २०२२ पासून वेतन नियमित व प्रचलित नियमानुसार द्यावे, असे म्हटले आहे.
हेही वाचा – अंधारात नेऊन अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे
न्यायालयाच्या निर्णयानंतरही वेतन दिले जात नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. दिवाळीपूर्वी थकीत वेतन देऊन आमची दिवाळी गोड करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात सरदार पटेल मेमोरिअल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विजय आईंचवार यांना विचारले असता, दिवाळीसाठी वेतन दिले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, थकीत वेतनासाठी सर्व प्राध्यापक व कर्मचारी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढणार आहे.