नागपूर : जुनी पेन्शन योजना लागू करण्यास साफ नकार देणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता मात्र योजना लागू करण्याची भाषा करत आहेत. ही योजना पुन्हा लागू करण्याची ‘धमक’ फक्त भाजपमध्येच आहे, असा दावा ते करतात. शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी फडणवीस यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे विधान केले असले तरी फडणवीस यांच्या कपटनितीची शिक्षकांनाही कल्पना आहेच. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची ‘धमक’ आहे, तर मग पाच वर्षे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी झोपा काढल्या काय?, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.
हेही वाचा – नागपूर : १२ वर्षीय मुलगा गळफास घेतलेल्या स्थितीत, क्वार्टर परिसरात खळबळ
यासंदर्भात बोलताना, केंद्रातील अटबलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारनेच २००३ साली जुनी पेन्शन योजना बंद करून नॅशनल पेन्शन योजना (एनपीएस) लागू केली असताना देवेंद्र फडणवीस धादांत खोटे बोलत त्याचे खापर काँग्रेस सरकारवर फोडत आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते आरएसएसच्या शिकवणुकीनुसार धादांत खोटे बोलण्यात पटाईत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात जुनी पेन्शन योजना लागू करणे सरकारला शक्य नाही, असे स्पष्ट शब्दांत फडणवीस यांनी सांगितले होते. मग आताच फडणवीस यांच्यात धमक कुठून आली. नागपूरच्या अधिवेशनात किंवा मागील पाच वर्षे मुख्यमंत्री असताना ही धमक कोठे गेली होती? असे अतुल लोंढे म्हणाले.