वर्धा : अलीकडच्या काळात शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात नाममात्र प्रवेश घेवून शिकवणी वर्गात शिक्षण घेण्याचा प्रकार सर्रास सुरू असल्याचे राज्यभरातील चित्र आहे.त्यामुळे शाळा वर्ग ओस तर शिकवणी वर्ग तुडुंब भरल्याची स्थिती शिक्षकांना अस्वस्थ करणारी ठरली.ते पाहून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात काही सदस्यांनी ही बाब उपस्थित केली. त्यावर २७ जुलै रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात मत व्यक्त केले.ते म्हणाले की ही बाब सरकारच्या पण लक्षात आली आहे.
खाजगी शिकवणी वर्गामुळे शाळेतील विद्यार्थी संख्येवर परिणाम झाला आहे.त्यामुळे आगामी काळात किमान अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थी उपस्थिती सक्तीची करण्याबाबत शिक्षण विभागास आदेश देण्यात येतील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.ही बाब पुढे आल्यावर महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पेचात पडले.कारण अनुदानित शाळेतील उपस्थिती सक्तीची केल्यास तिथे विद्यार्थी प्रवेश घेणारच नाही.परिणामी मोठ्या संख्येत शिक्षक अतिरिक्त ठरतील.तेव्हा अशी केवळ अनुदानित शाळेतील उपस्थिती सक्तीची न करता राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांना विद्यार्थी उपस्थिती सक्तीची करावी.अशी मागणी आता मुख्याध्यापक संघटनेने केली आहे.