नागपूर : नागपूरमधील हिंसाचार प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये फहीम खान हा या हिंसाचारातील मास्टर माईंड असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. नागपूर महापालिका प्रशासनाने फहीम खानच्या घर बुलडोझरने पडण्याची कारवाई सोमवारी सकाळी सुरू केली.फहिम खानने यशोधरानगर ठाण्याच्या हद्दीतील संजय बाग कॉलनी येथील दोन मजली इमारतीचे अनधिकृत बांधकाम केले आहे. ते पाडण्याचे काम सुरू झाले आहे. महापालिकेने काल त्याच्या घरावर अनधिकृत बांधकाम काढून घेण्याची नोटीस बजावली होती. २४ तासांची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर आज सकाळी महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक संजय बाग कॉलनीत धडकले. वीज वितरण कंपनीने वीज जोडणी तोडली. दरम्यान, काल महापालिकेची नोटीस बाजवल्यातर फहिम खानचे कुटूंबीय भयभीत झाले. ते काल रात्री घरून निघून गेले, असे सांगण्यात येत आहे. त्यांच्या नातेवाईकडे संपूर्ण कुटूंबीय गेल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

नागपूरमधील हिंसाचार प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमधून) आलेल्या माहितीनुसार, फहीम खान हा या हिंसाचारातील मास्तर माईंड असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. हिंसाचाराच्या दिवशी फहीम खानने परिसरात जमाव जमावल्याचे स्पष्ट उल्लेख या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. परिणामी जमाव जमवून हिंसा भडकवल्याचा आरोप करत नागपूर हिंसाचारातील म्होरक्या फहीम खानच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असताना आता नागपूर हिंसाचाराचा मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर सरकार बुलडोझर चालवण्यात येत आहे. त्यामुळे फहीम खानला आणखी एक मोठा धक्का प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

दरम्यान, नागपूर हिंसाचार प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नागपूरचे जिल्हाप्रमुख उत्तम कापसे यांनी केली आहे. हिंसाचारात अनेक निर्दोष लोकांना पोलीसांनी आरोपी म्हणून अटक केली आहे. त्याची सत्यता तपासली जावी, यासाठी न्यायालयीन चौकशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून केली जात आहे. नागपूरच्या संचारबंदी असलेल्या सर्व भागातून संचारबंदी काल दुपारी तीन वाजल्यापासून पूर्णपणे उठवली आहे. त्यामुळे महाल, छत्रपती शिवाजी चौक, चिटणीस पार्क चौक, भालदारपुरा, हंसापुरी या सर्व भागांमध्ये आता सामान्य लोकांचे जीवन पूर्ववत होताना दिसून येत आहे.