नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्यावर यकृताशी संबंधित आजारावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी त्यांची तब्येत अचानक खालावली आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. ते ५९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
डॉ. चौधरी यकृताशी संबंधित आजारावर मागील काही महिन्यांपासून उपचार घेत होते. त्यासाठी काही दिवसांपूर्वी त्यांना नागपुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मागील आठवड्यात रात्री प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना उपचारांसाठी मुंबई येथे नेण्याचा निर्णय निकटवर्तीयांनी घेतला होता. त्यानुसार, ‘एअर अॅम्बुलन्स इंडिया’ या कंपनीशी संपर्क साधून एअर अॅम्ब्युलन्सची नोंदणी करण्यात आली. त्यासाठी सात लाख रुपयांचा भरणाही कंपनीकडे करण्यात आला. मात्र वेळेत एअर अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने त्यांच्यावर नागपूरातील खाजगी रुग्णालयातच उपचार सुरू होता, मात्र यात डॉक्टरांना यश न मिळाल्याने अखेर गुरुवारी त्यांचे निधन झाले.
कोण होते डॉ. सुभाष चौधरी?
डॉ. सुभाष चौधरी (जन्म १८ मे १९६५) यांनी स्थापत्य अभियांत्रिकी विषयात पदव्युत्तर पदवी तसेच पीएच. डी. प्राप्त केली असून त्यांना अध्यापन, संशोधन तसेच प्रशासन क्षेत्रात व्यापक अनुभव होता.(जन्म १८ मे १९६५) यांनी स्थापत्य अभियांत्रिकी विषयात पदव्युत्तर पदवी तसेच पीएच. डी. प्राप्त केली असून त्यांना अध्यापन, संशोधन तसेच प्रशासन क्षेत्राचा व्यापक अनुभव होता. ८ ऑगस्ट २०२० मध्ये त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची धुरा सांभाळली.
हेही वाचा – नागपूर हिट अॅण्ड रन : नाट्यमय घडामोडीनंतर अखेर रितिका मालूला अटक
सायन्स काँग्रेस, शताब्दी सोहळा हे प्रमुख योगदान
मध्य भारतातील सर्वात जुने विद्यापीठ असलेल्या नागपूर विद्यापीठाच्या शतकोत्तर महोत्सवी सोहळा हा कुलगुरू चौधरींच्या काळात झाला. या सोहळ्याच्या निमित्त वर्षभर विविध उपक्रम विद्यापीठांमध्ये राबवण्यात आले. यासाठी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्यासह अनेक मान्यवरांनी विद्यापीठाच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. यासोबतच जानेवारी २०२३ मध्ये नागपूर विद्यापीठात सुभाष चौधरी यांच्या नेतृत्वात इंडियन सायन्स काँग्रेसचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
कर्मचारी म्हणतात असा कार्यतत्पर कुलगुरू होणे नाही
डॉ. चौधरींच्या निधनाचे वृत्त कळताच विद्यापीठाचे शिक्षक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. कुलगुरू चौधरी हे आपल्या कामात अत्यंत तत्पर होते. त्यांनी कुठल्याही कर्मचाऱ्याला कधीही अपमान जनक वागणूक दिली नाही, तर कुठलेही काम असले तरी ते स्वतःहून पुढाकार घेऊन करत असल्याचे भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. त्यांच्या टेबलवर कधीही कुठलीही फाईल पेंडिंग राहत नव्हती. रात्री कितीही उशीर झाला तरी संपूर्ण काम संपवूनच ते घरी जात होते. चौधरी हे अत्यंत कार्यकुशल कुलगुरू होते अशी भावना विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा – लोकजागर: गडचिरोलीचे यश!
निलंबनाची कारवाई सुरू होती
डॉ. चौधरी यांना २१ फेब्रुवारी २०२४ ला कुलपतींनी निलंबित केले होते. मात्र, निलंबन करताना अपेक्षित कायदेशीर प्रक्रियेचे पालन न झाल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने डॉ. चौधरींचे निलंबन रद्द करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर डॉ. चौधरी यांनी ११ एप्रिलला पुन्हा पदभार स्वीकारला. परंतु, यानंतर लगेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे यांच्या समितीकडून चौकशी सुरू करण्यात आली. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर कुलपतींनी चौधरी यांना ४ जुलै ला कुलपतींनी दुसऱ्यांदा निलंबित केले होते. यासंदर्भात कारवाई सुरू होती.