कविता नागापुरे, लोकसत्ता
भंडारा : लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आली आहे. उद्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा होऊन आचारसंहिताही लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय परिघात लगबग वाढली आहे. त्यातच युतीची दुसरी यादी जाहीर झाली असून या यादीतही भंडारा गोंदिया- मतदार संघाचे नाव नसल्याने आता अनेक शंका कुशंकाना पेव फुटले आहेत. भंडारा-गोंदिया मतदार संघाची जागा आघाडी व महायुतीत कोणाला सुटेल, उमेदवार कोण असेल याची स्पष्टता नसल्याने संभ्रम कायम आहे. लग्नमंडप सजलाय, धामधुम वाढली आहे, वाजंत्री वाजते आहे; मात्र उमेदवाराचाच पत्ता नाही, अशी स्थिती आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दोन दिवसांपूर्वी महायुतीने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. दुसऱ्या यादीत भंडारा गोंदिया मतदार संघाच्या उमेदवाराचे नाव जाहीर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र विदर्भातील चारच मतदार संघाचे नाव यात होते. त्यामुळे या मतदार संघातील इच्छुक उमेदवारांसह मतदारांचाही भ्रमनिरस झाला. अशातच पक्ष श्रेष्ठीनी कौल आपल्या बाजूने द्यावा यासाठी इच्छुक उमेदवार देव पाण्यात बुडवून बसले आहेत. काहींनी तर सभागृह, गाद्या, खुर्च्या, प्रचारासाठी अनेक बाबी बुक करून जय्यत पूर्व तयारी केली आहे. मात्र उमेदवारी बाबत संभ्रमच असल्याने वाट बघण्याखेरीज त्यांच्याकडे पर्याय नाही. अशातच समाज माध्यमांवर मात्र या इच्छुक उमेदवारांचे समर्थक आणि कार्यकर्ते आपल्या लाडक्या नेत्यांपुढे “भावी खासदार” अशी प्रसिद्धी करीत आहेत.
आणखी वाचा- भंडारा- गोंदिया, गडचिरोली या जागा भाजपच्याच; बावनकुळेंनी टेन्शन वाढवले…
या मतदार संघात भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे आणि माजी मंत्री परिणय फुकेंच्या नावाची सुरुवातीला चर्चा होती. त्यातच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल त्यांनीही यात अनपेक्षितपणे उडी घेतली. त्यामुळे ही जागा भाजपकडे ठेवायची की राष्ट्रवादीला द्यायची यावर तोडगा काढण्यात अद्याप पक्ष श्रेष्ठींना यश आलेले नाही. निवडणूक विषयक आढावे घेऊन झालेत, तयारीही अंतिम टप्प्यावर आलेली असताना भंडारा गोंदियाचे नाव जाहीर करण्यात पक्ष श्रेष्ठीं कशाची वाट पाहत आहेत अशा चर्चांना उधाण आले आहे.
खरेतर निवडणूक तयारीचे पक्ष पातळीवरील नियोजनही तयार आहे; किंबहुना पक्षीय पातळीवरील मतदारांची मशागतही सुरू झाली आहे, तरी उमेदवारांची निश्चिती नाही. यातील अविश्वास व अनिश्चिततेच्या कारणामुळेही उद्या काय? ची उत्सुकता वाढीस लागली आहे.
आणखी वाचा- गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शहरात दिवसाढवळ्या गोळीबार… वाचा नेमके काय घडले?
काँग्रेसही पत्ते उघडेना…
महविकास आघाडीतही उमेदवाराबाबत कमालीची गुप्तता बाळगली जात आहे. येथेही अनेक नावांची चर्चा असून समाज माध्यमांवर काँग्रेसचे इच्छुक उमेदवारही “भावी खासदार ” म्हणूनच मिरवत आहेत. सध्या काँग्रेसचे “खाण्याचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे” असल्याचे बोलले जात आहे. युतीचा उमेदवार जाहीर झाल्यावरच काँग्रेस आपला हुकुमी एक्का बाहेर काढेल असे बोलले जात आहे.