सप्तखंजेरीवादक, कीर्तनकार सत्यपाल महाराज यांनी अमरावती जिल्ह्यातील त्या बाबाची पोलखोल करण्यासाठी गरम तव्यावर बसण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. त्याची चित्रफित त्यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केली. कुठलीही दैवी शक्ती किंवा चमत्कार नसून भोंदू बाबाची ही हातचलाखी आहे. त्याला बळी पडू नका, असे आवाहन सत्यपाल महाराजांनी केले.
हेही वाचा >>>बुलढाणा: अर्ध्यावरती डाव मोडलेल्यांचे पुनर्वसन; घटस्फोटित, विधवा-विधुर परिचय संमेलनाने सामाजिक क्रांतीचे बीजारोपण
अमरावती जिल्ह्यातील मार्डी येथील एक भोंदू बाबा गरम तव्यावर बसून भक्तांना अर्वाच्य भाषेत शिव्या देत असल्याची एक चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती. आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा त्या बाबाने केला होता. त्यानंतर बाबा गावातून पसार झाला. या प्रकरणी आता सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराजांनी एक चित्रफीत तयार करून समाजमाध्यमांवर प्रसारित केली. त्यामध्ये सत्यपाल महाराजांनी गरम तव्यावर बसण्याचे प्रात्यक्षिक केले. कशा प्रकारे फसवणूक केली जाते, हे सत्यपाल महाराजांनी त्या चित्रफीतमध्ये दाखवले आहे. काळ्या रंगाचा कापड ओला करून तो तव्यावर ठेवला. त्याद्वारे गरम तव्यावर काही मिनिटे सहज बसू शकतो, याचे प्रात्यक्षिक सत्यपाल महाराजांनी करून दाखवले. या प्रकारच्या अंधश्रद्धेला बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे.