यवतमाळ : जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई पदभरतीत एका उमेदवाराने चक्क प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र जोडून पोलीस बनण्याचा प्रयत्न केला. मात्र, निवडीनंतरच्या पडताळणीत त्याचे पितळ उघडे पडले. तर, एका अंशकालीन उमेदवाराने बीड तहसीलदार कार्यालयाचे बनावट प्रमाणपत्र सादर करून फसवणूक करण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी तोतयेगिरी करणार्याविरुद्घ यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.अंबादास दिनकर सोनाने (२५, रा. खांबा (लिंबा), जि. बीड), असे फसवणूक करणार्या अंशकालीन उमेदवाराचे नाव आहे. जानेवारी महिन्यातयवतमाळ घटकात चालक शिपायांच्या ५८ पदांसाठी व पोलीस शिपायांच्या २४४ पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात आली होती.यापूर्वी किशोर तोरकड (२४, रा. बोरीबन, ता. उमरखेड) या उमेदवाराने प्रकल्पग्रस्ताचे बनावट प्रमाणपत्र बनवून फसवणूक करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, कागदपत्रांच्या पडताळणीत हे बिंग फुटले. त्यानंतर पोलीस कवायत मैदानातील भरती प्रक्रियेत २३ जानेवारी २०२३ रोजी अंबादास दिनकर याने अंशकालीन या समांतर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी बीड तहसीलदार यांच्या कार्यालयाचे प्रमाणपत्र सादर केले.
हेही वाचा >>>“चंद्रपूर लोकसभा मतदार संघावर आमदार प्रतिभा धानोरकर यांचा पहिला हक्क”, जिल्हाध्यक्ष धोटे म्हणाले…
हेही वाचा >>>परिवहन विभागाकडून लांब पल्ल्याच्या बस चालकांची मद्य तपासणी; अपघात टाळण्यासाठी सुरक्षात्मक उपाययोजना
निवड झाल्यानंतर प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी बोलावण्यात आले होते. पडताळणीत सदर प्रमाणपत्रही बनावट निघाले. बीड तहसीलदारांनी सदर प्रमाणपत्र बनावट असल्याचा स्पष्ट अभिप्राय दिला. याप्रकरणी पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रमुख लिपिक ताराचंद धारगावे यांनी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अंबादास सोनोने याच्याविरुद्घ गुन्हा नोंदविण्यात आला. बनावट प्रमाणपत्र बनवून देणार्यांची टोळीच सक्रीय असून, त्यांना गजाआड करण्याचे आव्हान यवतमाळ शहर पोलिसांपुढे आहे.