नागपूर : महाविद्यालयातील शिष्यवृत्ती, जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखल अशा विविध स्वरूपाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता असते. मात्र, ई-सेवा केंद्राच्या नावावर बनावट प्रमाणपत्रे बनवणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. या टोळ्या शासकीय अधिकाऱ्यांच्या हुबेहूब सह्या करून बनावट प्रमाणपत्र बनवतात. अशाच एका टोळीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्यांनी अनेक प्रमाणपत्र बनावट तयार केल्याची कबुली दिली आहे. भास्कर मांदाडे (४३) रा. इसासनी आणि रितेश सहारे (४०) रा. मनीषनगर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरोपी भास्कर मांदाडे वैशालीनगर परिसरात महाराष्ट्र सरकारचे ई-सेवा केंद्र चालवतो. रविकांत शर्मा (२७) रा. वैशालीनगर, हिंगणा हा २०१९ मध्ये बीएस्सी झाला. तेव्हापासून तो स्पर्धा परीक्षांची तयारी करीत होता. २०२२ मध्ये रविकांतने राज्य उत्पादन शुल्क विभागात दुय्यम निरीक्षक पदासाठी अर्ज केला होता. त्यासाठी त्याने मांदाडेच्या सेवा केंद्रातून नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र बनवले होते. नोव्हेंबर २०२२ मध्ये तो परीक्षेत उत्तीर्ण झाला. फेब्रुवारी २०२३ मध्ये मुख्य परीक्षा झाल्यानंतर त्याची निवडसुद्धा झाली. १३ जुलैला शारीरिक चाचणी झाली.

हेही वाचा >>> चंद्रपूर : वीज केंद्रातील वाघावर वनविभागाची नजर, कॅमेराद्वारे पाळत

विभागाने त्याच्याकडून जमा करण्यात आलेले प्रमाणपत्र पडताळणीसाठी जिल्हा अधिकारी कार्यालयात पाठवले. अहवाल येण्यास उशीर होत असल्यामुळे रविकांतने स्वत: कार्यालयात जाऊन चौकशी केली असता नॉन क्रिमिलेअर बनावट असल्याचे समजले. विशेष म्हणजे, प्रमाणपत्रावर उपजिल्हाधिकाऱ्यांचा शिक्का आणि स्वाक्षरीसुद्धा होती. रविकांतने मांदाडेला जाब विचारला असता त्याने रितेशकडून प्रमाणपत्र बनवून घेतल्याची माहिती दिली. रविकांतने प्रकरणाची तक्रार एमआयडीसी पोलिसात केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींवर फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली.

हेही वाचा >>> “साहेब मुलगा लांब नोकरीला, आम्ही वृद्ध, त्याच्या बदलीसाठी प्रयत्न करा”; वृध्दांची गडकरींना विनंती

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ

मुलांचे शैक्षणिक प्रमाणपत्र काढण्यासाठी आलेल्या पालकांना दलाल हेरतात. कमी पैशात प्रमाणपत्र काढून देण्याचे सांगून बनावट प्रमाणपत्र हातात ठेवतात. मुलांना शैक्षणिक कामात अडचणी येत नाहीत. परंतु, नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर पडताळणीत बनावट प्रमाणपत्र असल्याचे उघडकीस येते. त्यामुळे नोकरीसाठी पात्र असलेल्या उमेदवाराची नोकरी जाण्याची भीती असते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fake certificates in the name of e seva center many gangs are active adk 83 ysh
Show comments