अक्षय कुमारचा स्पेशल २६ चित्रपट आठवतोय… अक्षय कुमार आणि त्याचे साथीदार सीबीआयसाठी तरुणांची भरती करतात आणि छापा टाकतात….असाच काहीस प्रकार नागपूरमध्ये घडला आहे. नागपूरमध्ये तोतया पोलीस अधिकाऱ्याने थेट क्राईम ब्रँचची शाखाच थाटली असून नरेश पालरपवार असे या तोतया अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली असून त्याने कोणाची फसवणूक केली आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत.

धंतोली पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या समर्थनगर परिसरात नरेश पालरपवार याने क्राइम इन्वेस्टिगेशन एजन्सी नावाने कार्यालय सुरु केले. या कार्यालयात येणाऱ्या लोकांना ते क्राईम ब्रँचचे कार्यालय वाटावे म्हणून तिथे वॉकीटॉकी देखील ठेवले होते. नरेश यावरच थांबला नाही. त्याने स्वत:च्या कारवरही संचालक, क्राइम इन्वेस्टिगेशन एजन्सी असा फलक लावला होता.

नरेशने फेसबकुवर अनेक पोलीस अधिकाऱ्यांसोबत छायाचित्र अपलोड केले होते. त्याचे राहणीमानही एखाद्या पोलीस अधिकाऱ्यासारखेच होते. नरेश हा मूळचा यवतमाळमधील उमरसरा येथील रहिवासी आहे. यवतमाळमध्येही तो अनेकांना क्राइम ब्रँचशी संबंधित असल्याचे सांगायचा. त्याने स्वत:च्या कारवर दिवा देखील लावला होता, असे समजते. अशिक्षित किंवा कायद्याविषयी पुरेशी माहिती नसलेल्या लोकांना त्याने गंडा घातला असावा, अशी शक्यचा आहे. नरेशने समर्थनगरमधील ज्या इमारतीत कार्यालय सुरु केले होते, त्यासाठी तो महिन्याला सहा हजार रुपये भाडे द्यायचा, अशी माहितीही समोर आली आहे.

या घटनेवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधी पक्षांनी टीका केली आहे. नागपूरमध्ये ‘स्पेशल २६’ नागपुरात एका पठ्ठ्याने चक्क क्राइम ब्रँचची बनावट शाखाच सुरू केली होती. मुख्यमंत्रीच राज्याचे गृहमंत्री आहेत आणि त्यांना नागपूरचा अभिमानही आहे. आता त्यांनी नागपूरच्या कायदा सुव्यवस्थेकडेही लक्ष द्यावे, अशी चर्चा नागपुरात सुरू असल्याचे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे.

Story img Loader