नागपूर : नवजात बाळाची तस्करी करणाऱ्या बनावट जोडप्याचे आरपीएफच्या पथकाने पितळ उघडे पाडले. चंद्रपूर स्थानकाहून पाठलाग करून त्यांना बल्लारशाह रेल्वेस्थानकावर अटक करण्यात आली. बाळ सतत रडत असल्याने आरोपींचे बिंग फुटले. द्रौपदी मेश्राम (४०), रा. गिट्टीखदान, चंद्रकांत पटेल (४०), रा. मलाड ईस्ट, मुंबई अशी अटकेतील तस्करांची नावे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवजात बाळाच्या तस्करीसाठी आरोपींनी पती-पत्नी असल्याचा बनाव केला. अहमदाबादवरून विजयवाडा येथे जाण्यासाठी नवजीवन एक्सप्रेसने निघाले. मात्र, आरपीएफच्या कर्तव्यदक्ष जवानांनी त्यांचे पितळ उघडे पाडले. सुरुवातीला आरोपींनी खोटी माहिती देऊन जवानांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. संशय वाढल्याने त्यांच्याकडील मोबाईल हिसकावून तपासणी केली असता व्हॉट्सॲप चॅटिंगमध्ये त्या बाळाच्या अपहरणाचा तपशील आढळला.

हेही वाचा: नागपूर: उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात गांधीजींच्या मारेकऱ्याच्या नावाने कार्यालय!

चंद्रपूर आरपीएफचे निरीक्षक के.एन. राय यांना गुप्त माहिती मिळाली की, नवजीवन एक्सप्रेसने (गाडी क्र.१२६५५) बाळाची तस्करी होत असून ते बाळ सतत रडत आहे. या माहितीच्या आधारे राय यांच्या नेतृत्वात मानव तस्करी विरोधी पथकाचे सदस्य उपनिरीक्षक प्रवीण महाजन, संजय शर्मा, आर.एल. सिंह यांच्यासह गुन्हे शाखेचे मुकेश राठोड, प्रवीण गाडवे, आरती यादव यांनी चंद्रपूर रेल्वेस्थानकावर गाडीची तपासणी केली. मात्र, काहीच संशयास्पद आढळले नाही. त्यामुळे पथक बल्लारपूर रेल्वेस्थानकापर्यंत गेले.

दरम्यान, बर्थ क्रमांक २३ वर एक जोडपे संशयास्पद स्थितीत आढळले. त्यांच्याकडे दोन महिन्यांचे बाळ होते. बाळाबाबत विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. ते बाळ स्वतःचे असल्याचे सांगितले. परंतु, संशय वाढल्याने जोडप्याला बल्लारपूर रेल्वेस्थानकावर उतरवून पोलीस ठाण्यात आणले आणि सखोल चौकशी केली. त्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांच्याजवळचा मोबाईल तपासला असता त्यातील रेकॉर्ड व व्हॉट्सॲप चॅटिंगमुळे बाळाला अहमदाबादवरून तस्करी करून विजयवाडा येथे नेण्यात येत असल्याचे उघडकीस आले. आरोपीजवळून मोबाईल आणि तीन हजार रुपये जप्त केले. वैद्यकीय तपासनंतर बाळाला चाईल्ड लाईनच्या सुपूर्द केले. तर आरोपींना लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई मध्य रेल्वेचे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

हेही वाचा: “…तर त्यावर माझी स्वाक्षरी…”; विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव मांडणाऱ्या मविआ आमदारांना अजित पवारांचा घरचा आहेर

महिला तस्करास पाच हजार रुपये

नवजात बाळ तस्करीसाठी महिलेला पाच हजार तर पुरुषाला दहा हजार रुपये देण्यात आले होते. तसेच अहमदाबादहून विजयवाडा येथे पोहोचून देण्याची जबाबदारी दिली होती. असे आरपीएफच्या तपासात दोघांनी कबुली दिली. यावरून हे मानव तस्करीचे मोठे रॅकेट असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fake couple who smuggled a newborn baby arrested by rpf police at ballarshah railway station nagpur adk 83 tmb 01