लोकसत्ता टीम
नागपूर: ‘सीआरपीएफ’मध्ये अधिकारी आहे. बदलीमुळे घरातील फ्रिजसह इतर साहित्य अत्यल्प दरात विक्री करण्याचा सापळा टाकत नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने लुटणाऱ्या तोतया सीआरपीएफ जवानासह त्याच्या सहकाऱ्यांना सायबर पोलिसांनी रायस्थानमध्ये अटक केली.
सुरेंद्र प्रितम सिंह (२८) रा. गांव कुशाल बास, तहसील मुण्डावर जिल्हा अलवर, तौफिक खान फतेह नसिब खान (२५) रा. गांव नागालिया, तहसील किसनगढ़ बाज, जिल्हा अलवर, संपतराम श्रीबंसीलाल प्रजापत (३३) रा. गांव ककराली मेव, तहसील अलवर जिल्हा अलवर राजस्थान असे आरोपींची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने विनोद महोदेवराव कडू रा. महेश टॅव्हल्स जवळ, गिरीपेठ, नागपूर यांना त्यांच्या मित्राच्या नावाने बनावट दुसरे खाते तयार करून फेसबुकवर फेंड रिक्वेस्ट पाठविली.
आणखी वाचा-आमदाराकडे जाऊन थकले; गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून बांधला रस्ता, गडचिरोलीतील दुर्गम भागात विदारक स्थिती
दरम्यान विनोदचा विश्वास संपादन करत व्हॉट्सॲप क्रमांक घेत चॅटिंग सुरू केली. मी अमितेश कुमार सीआरपीएफचा अधिकारी असून आपला मित्र संतोष कुमारचा मित्र असल्याचे भासवले. माझी बदली झाल्याने येथे नुकतेच घेतलेले फ्रिज, वॉशिंग मशीन, एसी, फर्निचर इत्यादी साहित्य अल्प दरात विकारचे असल्याचे त्याने भासवले. आरोपीने विनोदला पाठवलेल्या देयकावर भारतीय राजमुद्रा असलेला लोगो, सीआरपीएफच्या लोगोचा होता. त्यामुळे विनोदने साहित्य घेण्यासाठी २४ हजार रुपये ऑनलाईन त्याच्या खात्यात वळते केले.
दरम्यान साहित्य मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे कळल्यावर विनोदनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी ऑनलाईन व्यवहारातील पैसे कुठे- कुठे वळते झाल्याचे निरीक्षण करून आरोपींना राजस्थानमध्ये जाऊन अटक केली. तर आरोपीच्या बँक खात्यातील रक्कही फ्रिज करून ठेवण्यात आली आहे. या पद्धतीने शहरात आरटीओ अधिकाऱ्यासह इतरही बऱ्याच जणांसोबत फसवणूकीचे प्रयत्न झाले आहे. त्यामुळे नागपूर वा देशातील इतरही भागातील या पद्धतीचे किती गुन्हे उघडकीस येणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.