नागपूर : शहरातील जरीपटका परिसरातील चॉक्स कॉलनीत बनावट नोटा छापण्याचा कारखाना सुरु होता. त्या कारखान्यातून आतापर्यंत कोट्यवधी रुपयांच्या बनावट नोटा छापण्यात आल्या असून त्या नोटा देशातील १० ते १५ राज्यात चलनासाठी पाठविण्यात आल्या.
मध्यप्रदेश पोलिसांना या छापखान्यातून छापलेल्या बनावट नोटा हाती लागल्या. त्यामुळे मध्यप्रदेश पोलिसांनी नागपुरात छापा घालून टोळीच्या मुख्य सूत्रधारांना अटक केली. मलकीत सिंह गुरमेश सिंह विर्क (चॉक्स कॉलोनी, कामठी रोड, नागपूर) आणि मनप्रीतसिंह कुलविंदरसिंह विर्क (२६ चॉक्स कालोनी) अशी आरोपींची नावे आहेत. या टोळीतील ६ आरोपींना पोलिसांनी अटक केली.जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मलकीतसिंह विर्क आणि मनप्रीतसिंह विर्क यांनी झटपट पैसा कमविण्यासाठी सोपा मार्ग म्हणून बनावट नोटा छापण्याचा कारखाना सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी दिल्लीला जाऊन बनावट नोटा छापण्याचे प्रशिक्षण घेतले. तसेच हुबेहुब नोटा छापणाऱ्या मशिन्ससुद्धा विकत आणल्या. गेल्या अनेक दिवसांपासून जरीपटक्यात हा कारखाना सुरु होता.
मलकीतसिंह आणि मनप्रीतसिंह यांनी जवळपास १० ते १५ राज्यात टोळ्या तयार करुन बनावट नोटा चलनात आणण्याचे नियोजन केले. त्यानुसार सुरुवातीला २०० आणि ५०० रुपयांच्या नोटा छापल्या. त्या नागपुरातील बाजारात चलनात आणल्या. कुणालाही संशय न आल्यामुळे दोघांनीही लाखोंच्या नोटा छापने सुरु केले. मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, गुजरात, गोवा, केरळ, पंजाब यासह अन्य राज्यात बनावट नोटा पाठवणे सुरु केले. बनावट नोटाबाबत कुठूनही तक्रार येत नसल्यामुळे विर्क बंधूंनी कोट्यवधीच्या नोटा रात्रंदिवस छापने सुरु केले.
असा आला कारखाना उघडकीस
मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये शुभम ऊर्फ पुष्पांशू मदन रजक (जबलपूर) हा युवक बारबालांवर पाचशेच्या नोटा उधळत होता. खबऱ्यांनी शुुभमची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी शुभमला अटक केली. त्याच्याकडे दोन लाखांच्या बनावट नोटा मिळून आल्या. त्याने नसरुल्लागंज येथील महिपाल उर्फ मोहित बेडा यांच्याकडून नोटा विकत घेतल्याचे सांगितले. मोहितकडून नागपुरातील विर्क बंधुंची नावे समोर आली. त्यामुळे मध्यप्रदेश पोलिसांनी जरीपटक्यातील बनावट नोटांच्या कारखान्यावर छापा घातला. तेथे दोन लाख रुपयांच्या बनावट नोटा मिळून आल्या. या टोळीतील अनुराग धर्मसिंह चौहान (सिहोर) आणि मोहसिन नासिर खान (दाऊदी नगर, खजराना-मध्यप्रदेश) यांनाही अटक करण्यात आली.
२० हजारांत एका लाखांच्या नोटा
विर्क बंधू हे कोट्यवधी रुपयांमध्ये बनावट नोटा छापत होते. त्यामुळे छापलेल्या नोटा वेगवेगळ्या राज्यात ट्रॅव्हल्सने पाठविण्यात येत होत्या. २० हजार रुपयांमध्ये एक लाख रुपयांच्या बनावट नोटांची विक्री विर्क बंधू करीत होते. एक लाख रुपयांच्या बनावट नोटा बनविण्यासाठी केवळ ३०० रुपये खर्च येत होता. त्यामुळे विर्क बंधूना एका लाखांच्या नोटांवर चक्क १९ हजार ६०० रुपये नफा मिळत होता. कोट्यवधीच्या नोटा आतापर्यंत देशातील वेगवेगळ्या राज्यात चलनात आणल्या आहेत, अशी धक्कादायक माहिती पोलीस सूत्रांनी दिली.