बुलढाणा: पोलिसच काय कोणताही केंद्रीय, राज्य सरकारी कर्मचारी देखील जागृत असला अथवा दक्ष असला तरी त्याचा किती चांगला परिणाम दिसू शकतो, याचे एक उदाहरण आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या लोणार नगरीत दिसून आले. एका बँकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी दक्षता बाळगल्याने नकली नोटाचे एक मोठे रॅकेट (टोळी) पोलिसांच्या हाती लागले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता दहशतवाद विरोधी पथकाने देखील लोणार मध्ये दाखल होत आरोपीची चौकशी केली आहे. यामुळे या मागे काही देश विघातक संघटना तर नाही ना अशी शंका निर्माण झाली आहे.
खाऱ्या पाण्याचे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सरोवर ही लोणार नगरीची ओळख आहे. यामुळे सरोवर नगरी लोणार पर्यायाने बुलढाणा जिल्ह्याचे नाव जगभरात गेले आहे. दरवर्षी लोणारमध्ये विदेशातील अनेक शाश्त्रज्ञ्, संशोधक येतात. या लोणारमध्ये नकली नोटांचे मोठे रॅकेट समोर आले आहे. लोणार पोलिसांनी आतापर्यंत ५ आरोपींना अटक केली आहे. यातील एक आरोपी उच्च शिक्षित देखील आहे. आरोपी लोणार आणि लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथील राहणारे आहे. यात आणखी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आरोपीचे मोठ्या संघटनेशी संबंध असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे या संवेदनशील प्रकरणाचे एकूणच गांभीर्य लक्षात घेता लोणार पोलिसांनी या प्रकरणात कमालीची गोपनीयता बाळगली आहे. लोणार पोलीस यावर तपशीलवार बोलण्यास इच्छुक नाहीत मात्र संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने या कारवाईबाबत माहिती दिली. आज अखेर पाच आरोपीना क्रमा क्रमाने ताब्यात घेण्यात आल्याचे त्यांनी ‘लोकसत्ता’ सोबत बोलतांना सांगितले.
काल बुधवारी, २ एप्रिल रोजी दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) लोणार मध्ये दाखल झाले होते. त्यांनी देखील आरोपींची कसून चौकशी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या आरोपींचे हैदराबादसह शेजारी राष्ट्राशी संबंध आहेत का ? किंवा कुठल्या देश विघातक कृत्यांमध्ये हे आरोपी सहभागी आहेत का? या दृष्टीने दहशतवाद विरोधी पथकाने आरोपींची चौकशी केली आहे. मात्र या चौकशीतून काय समोर आले हे अद्याप कळू शकले नाही.
असे उघड झाले रॅकेट
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागील आठवड्यात एक माणूस भारतीय स्टेट बँकेत पैसे भरण्यासाठी आला होता. मात्र तो भरत असलेल्या नोटा नकली असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर दक्ष बँक कर्मचारी, अधिकारी यांनी याबद्दलची माहिती पोलीस प्रशासनाला दिली होती. यानंतर एक एक करत आतापर्यंत पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे यातील एक आरोपी हा उच्च शिक्षित आहे . आरोपी लोणार आणि सुलतानपूर येथील असल्याचे सूत्रांनी सांगितले, मात्र आरोपी बद्दल कमालीची गोपनीयता पाळण्यात येत आहे, कारण यात आणखी मोठे मासे गळाला लागतात का ? या दृष्टीने पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने या प्रकरणाचा दुजोरा दिलेला असला तरी तपासाच्या कारणास्तव अधिक बोलण्यास नकार दिला.काल या प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाने देखील आरोपींची चौकशी केली. नकली नोटांच्या माध्यमातून आरोपींचा देश विघातक कृत्यांमध्ये सहभाग आहे का? नकली नोटा कुठून आल्या याबद्दल दहशतवाद विरोधी पथकाने चौकशी केल्याचे समजते.