लोकसत्ता टीम

यवतमाळ : ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटाने वैद्यकीय क्षेत्रातील उणीवांवर बोट ठेवत भावनिक उपचारांच्या गरजेवर भर दिला होता. पण, शास्त्रोक्त वैद्यकीय शिक्षण न घेता रूग्णांवर उपचार करणे, हे जीवघेणेच आहे. तरीही प्रशानाचे दुर्लक्ष, कायद्यातील त्रुटी यामुळे अनेक मुन्नाभाई ग्रामीण भागात लोकांवर बिनबोभाट उपचार करतात. अशीच एक घटना घाटंजी तालुक्यात उघडकीस आली.

तालुक्यातील भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत येत असलेल्या बोरगाव पुंजी येथे कोलकता येथील एका बोगस डॉक्टरने दवाखाना थाटून अनेकांच्या आरोग्याशी खेळ चालविला. या कथित डॉक्टरच्या दवाखान्यावर धाड टाकून त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पुढाकारात घाटंजी पोलिसांनी केली. मिथून बिस्वास, रा. कोलकता, पश्चिम बंगाल असे बोगस डॉक्टरचे नाव आहे. मात्र दिवसभर काथ्याकुट करून या डॉक्टरला अटक केल्यानंतर अवघ्या दोन तासांत त्याला सोडून देण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे.

आणखी वाचा-अमरावती : आमदार बच्‍चू कडू यांच्‍या जीवाला धोका, जिल्‍हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र…

भांबोरा आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी शुभम संजय वाडेवाले यांनी दिलेल्या तक्रारीवरून घाटंजी पोलिसांनी बोरगाव पुंजी येथे अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करीत असलेल्या मिथून बिस्वास याच्यावर गुन्हा दाखल केला. मात्र अवघ्या दोन तासांत आरोपीस केवळ सूचनापत्रावर सोडून देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिक शोधून कारवाई करण्यासाठी असलेले विस्तार अधिकारी अरुण खांडरे, अन्न निरीक्षक संजय मोहनसिंग राठोड, डॉ.धर्मेश चव्हाण यांच्या पथकाने बोरगाव पुंजी येथील वॉर्ड क्र.आठमध्ये अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणारा मिथून बिस्वास याच्याकडे छापा टाकला.

तो मूळ राहणारा पश्चिम बंगालचा आहे. त्याच्याकडे महाराष्ट्र राज्य वैद्यकीय व्यावसायिक म्हणून नोंदणी करावयाचे कोणतेही कागदपत्र आढळले नाही. तसेच त्याच्याकडे औषध, इंजेक्शन व इतर वैद्यकीय उपचाराच्या वस्तू असा ११ हजार ६८ रुपयांचा मुद्देमाल सापडला. डॉक्टर म्हणून रुग्णांना सेवा द्यायची असल्यास त्यांना महाराष्ट्र सेवा अधिनियम १९६१ मधील कलम ३३(२), ३३ अ अन्वये औषध व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० चे सहवाचन १८ अ संबंधित वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. मात्र मिथून बिश्वास याच्याकडे कोणतेही प्रमाणपत्र व नोंदणी आढळली नाही. त्यामुळे कारवाई करत या बोगस डॉक्टरला ताब्यात घेवून घाटंजी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

आणखी वाचा-धक्कादायक! ‘एनडीए’ सरकारच्या काळात बँकांच्या फसवणुकीत १५ पट वाढ!

मात्र या डॉक्टरची लगेच सुटका करण्यात आली. कायद्यातील तरतुदीनुसार या गुन्ह्यासाठी केवळ दोन वर्षाची शिक्षा आहे. त्याला सूचना पत्र देऊन सोडून दिले. मात्र तपासासाठी वेळोवेळी पोलीस ठाण्यात बोलाविण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय थाटणारे मुन्नाभाई कायद्यातील त्रुटींचा फायदा घेत, ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. अशा डॉक्टरांविरूद्ध कोणताही कठोर कायदा नसल्याने त्याचा फायदा या मुन्नाभाईंना होतो व पोलिसही केवळ सूचनापत्र देत अशा कथित डॉक्टरांना सोडत असल्याने ग्रामीण नागरिकांच्या जीवावर बेतण्याची भीती व्यक्त होत आहे.