नागपूर : सायबर गुन्हेगारीपासून कसा बचाव करावा आणि सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकू नका, असा संदेश देणाऱ्या पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांचेच सायबर गुन्हेगारांनी बनावट फेसबुक खाते तयार केले. त्यांच्याच फेसबुक खात्यावरुन संपर्क करीत एका व्यक्तीला जाळ्यात अडकवले. त्याच्या खात्यातून ८५ हजार रुपये उकळले. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली. रूकमुद्दीन खान शफ्फी खान, शाकीर खान कासम खान आणि इन्नस खान निजरदीन खान अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपुरात राहणारे फिर्यादी मोहम्मद यासीर बशीर यांच्या त्यांच्या भ्रमणध्वनीवर डॉ. रवींद्रकुमार सिंगल या नावाने ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ आली. त्यांनी ती स्विकारली आणि नंतर त्यांनी संदेश पाठवला. ‘सीआयएसएफ अधिकाऱ्याची बदली झाली असून त्यांच्या घरातील फर्निचर विकायचे आहे. लाकडी साहित्याचे छायाचित्र पाठवून कमी दरात विक्री करीत असल्याचे संदेशव्दारे सांगितले.’ पोलीस आयुक्तांचे नाव पाहून मो. याशीर यांनी डोळे मिटून विश्वास ठेवला. आरोपीच्या सांगण्यानुसार वेगवेगळ्या बँक खात्यावर ८५ हजार रुपये नंतर आरोपीकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही तसेच फर्निचरसुध्दा आले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली. आरोपीविरूध्द माहिती तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

हेही वाचा : अकोला: दोन दिवसांत पक्षांतर अन् रवी राठी म्हणतात, “भाजपने केला घात…”

कोटामध्ये कार्यरत होते सायबर गुन्हेगार

बनावट फेसबुक आयडीवरुन फसवणूक झाल्याचा तपास सायबर पोलीस करीत असताना बनावट फेसबूक आयडी संबधाने आरोपीचे लोकेशन हे राजस्थानच्या कोटा खुर्द येथील असल्याचे लक्षात झाले. सायबर पोलीस पथकाने राजस्थानला जाऊन अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता इतर आरोपी हे स्थानिक असल्याचे स्पष्ट झाले. पथकाने इतर आरोपींना अटक केली. आरोपी रूकमुद्दीन हा फसवणुकीची रक्कम वेगवेगळ्या बँकेतून ‘विड्राल’ करतो तर आरोपी शाकीर आणि इन्नस हे दोघे बनावट फेसबुक आयडी तयार करून फसवणूक केली. त्यांनी महाराष्ट्रासह इतर राज्यातील पोलीस अधिकारी व महसूल अधिकारी यांच्या नावाने मोठ्या प्रमाणात बनावट फेसबुक आयडी तयार करून फसवणूक केली. त्यासाठी वेगवेगळ्या मोबाईल नंबरचा वापर केला. आरोपी हे आसाम, पश्चिम बंगाल राज्यातून मोबाईल सिम मागवून त्याचा बनावट फेसबुक आयडी तयार करण्याकरीता वापर करतात. आरोपीकडून चार मोबाईल जप्त करण्यात आले.

हेही वाचा : अनिस अहमद यांची वेळ चुकली की चुकवल्या गेली…

बहुसंख्य तरुण सायबर गुन्हेगारीत

राजस्थानमधील कोटा खुर्द या गावातील बहुसंख्य तरुण सायबर गुन्हेगारीत सक्रिय आहेत. विश्वासू व्यक्ती सायबर गुन्हेगारांना हवे असतात. त्यामुळे ते अनेक तरुणांना झटपट पैसे कमविण्याचे आमिष दाखवून टोळीत सहभागी करुन घेतात. प्रत्येकाला १ ते २ लाख रुपये प्रतिमहिला असे वेतन सायबर गुन्हेगार देतात. त्यामुळे अनेक तरुण सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fake facebook account in the name of nagpur police commissioner dr ravindrakumar singal adk 83 css