नागपूर : छत्तीसगडमधील क्रिकेट बुकींनी सुरू केलेल्या महादेव अॅपमधून देशभरातून कोटय़वधीचा क्रिकेट सट्टाबाजार उघडकीस आला होता. त्याच धर्तीवर चंद्रपुरातील क्रिकेट बुकींनी बनावट महादेव २ अॅप तयार करून संपूर्ण विदर्भासह राज्यभरात नेटवर्क उभारले आहे. या अॅपच्या माध्यमातून कोटय़वधीची सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राजस्थानचा जहाँगीर या मुख्य क्रिकेट बुकीने भिलाईच्या संगणक तज्ज्ञ असलेल्या सौरव चंद्राकर आणि रवी उप्पल नावाच्या दोन युवकांशी संगनमत करून महादेव बुक नावाने क्रिकेट सट्टेबाजीचे अॅप तयार केले होते. राजस्थानातून सुरू झालेल्या महादेव बुक अॅपने संपूर्ण देशभरात क्रिकेटच्या सट्टेबाजीचे जाळे तयार करीत हजारो कोटींची माया जमवली होती. त्याच धर्तीवर चंद्रपुरातील धीरज-नीरज, संपत-सिराज महेश आणि राजिक यांनी महादेव टू नावाने ऑनलाईन क्रिकेट सट्टेबाजीचे अॅप तयार केले असून त्याचे मुख्य केंद्र चंद्रपूर बनवले आहे. नागपुरातील कोटय़धीश असलेल्या सिराजने धीरज-नीरज, संपत आणि राजिक यांच्याशी भागीदारी केली. ‘नाईस ७७७’ नावाने बुकिंग सुरू करून ऑनलाईन क्रिकेट सट्टेबाजी सुरू केली. त्यासाठी पाच जणांनी ७ जणांची टीम तयार केली आहे. खायवाडी-लगवाडीसाठी कॉल सेंटरसुद्धा उभारले आहे. राज्यभरातून हजारो क्रिकेट चाहते महादेव टू अॅपच्या माध्यमातून सट्टेबाजी खेळतात. तर धीरज-नीरज हे दोघेही लाखोंमध्ये खायवाडी-लगवाडी करतात. चंद्रपुरात १६ क्रिकेट बुकींनी महादेव टू अॅपची आयडी-पासवर्ड देण्यात आला असून त्यांच्या माध्यमातून राज्यभरातून हजारो ग्राहकांकडून कोटय़वधीमध्ये खायवाडी—लगवाडी करण्यात येत असल्याची माहिती आहे. गेल्या काही महिन्यांपासून धीरज, नीरज, सिराज, राजिक आणि महेश यांची दिवसाला कोटी रुपयांमध्ये कमाई सुरू असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा >>>मेळघाटात कारची दुचाकीला धडक, चार जण ठार
ऑनलाईन क्रिकेट सट्टेबाजीचे पैसे बँक खात्यामार्फत घेण्यात येते. त्यासाठी चंद्रपुरातील आणि ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना हाताशी धरण्यात येते. त्यांना बँकेत खाते उघडण्यासाठी १० हजार रुपये देण्यात येते. खाते उघडल्यानंतर त्या युवकांना पैसे देऊन एटीएम कार्ड, पासवर्ड, पासबुक आणि अन्य अॅक्सेस घेण्यात येतो. त्या खात्यात लाखो रुपये जमा झाल्यानंतर पैसे काढून खाते बंद करून दुसरे खाते उघडण्यात येते.
चंद्रपूर पोलीस ‘सेट’?
चंद्रपुरात गेल्या अनेक महिन्यांपासून महादेव टू अॅप सुरू झाले असून पाचही भागीदारांनी चंद्रपूर पोलिसांना आणि स्थानिक गुन्हे शाखा पथकाशी ‘सेटिंग’ केल्याची चर्चा आहे. पोलिसांनी छापे घालू नये, कुठलीही कारवाई करू नये, म्हणून महिन्याकाठी लाखो रुपये संबंधित अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना क्रिकेट बुकी देत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
पोलीस अधीक्षकाच्या नावाने एक कोटीची मागणी?
चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने क्रिकेट सट्टेबाजांना चांगला दम भरला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी क्रिकेट सट्टेबाजी करायची परवानगी हवी असल्यास पोलीस अधीक्षकांना एक कोटी रुपयांची लाच द्यावी लागेल, अशी मागणी केली. त्यामुळे चंद्रपुरात एकच खळबळ उडाली. माझ्या नावाने कुणीही पैसे मागू शकत नाही. असा प्रकार घडला नाही. जर यामध्ये थोडेही तथ्य असल्यास योग्य ती कारवाई करू, अशी प्रतिक्रिया चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिली.