लोकसत्ता टीम
नागपूर : बनावट ऑनलाइन गेमिंग ऍप तयार करून देशभरातील हजारो गुंतवणुकदारांची कोट्यवधीने लुटणाऱ्या गोंदियातील सोंटू जैनच्या अंतरिम अटकपूर्व जामिनावर गुरूवारी तीनही पक्षांची बाजू मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ऐकून घेतली. याप्रकरणी न्यायमूर्ती महेंद्र चांदवाणी यांनी जामिनाच्या निर्णयावर (क्लोज फॉर ऑर्डर) निर्णय राखून ठेवला आहे. पुढील सुनावणी आता २६ सप्टेंबरला होणार आहे.
उच्च न्यायालयाने ५ सप्टेंबरला सोंटू जैनला अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. तसेच न्यायमूर्ती महेंद्र चांदवाणी यांनी सायबर पोलिसांना नोटीस बजावून १२ सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेशही दिले होते. सोंटूला ८, १0 व १२ सप्टेंबरला सिव्हील लाईन्स, सदर येथील सायबर पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश दिले होते.
आणखी वाचा-सावधान! शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष अन…
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अटीनुसार सोंटू लगेच दुबईवरून नागपुरात आला होता. सोंटूने तीन दिवस पोलीस ठाण्यात हजेरी दिली होती. नागपूर पोलिसांनी जैनच्या घरातून २६ कोटी ४0 लाख रुपयांचे घबाड जप्त केले होते. त्यात १२.४ किलो सोने, २९४ किलो चांदी आणि १६ कोटी ९० लाख रोख रकमेचा समावेश आहे. नागपुरातील व्यापारी विक्रांत अग्रवाल यांची सोंटूने आर्थिक फसवणूक केली होती.
आणखी वाचा-नागपूर विभागात ‘या’ ५०० जागांची भरती होणार, आयुक्तांनी घेतला आढावा
जैन याने विदेशातील काही सॉफ्टवेअर तज्ञाच्या माध्यमातून बनावट गेमींग अॅप तयार केले. अग्रवाल यांना अनंत जैन याने लिंक पाठवून गेम खेळण्यास प्रोत्साहित केले होते. ५८ कोटींची रक्कम सोंटूने हडप केली होती. फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर अग्रवाल यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार केली. आयुक्तांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन आरोपीच्या घरावर धाड टाकली होती. फिर्यादी अग्रवाल यांच्यातर्फे अॅड. श्रीरंग भांडारकर, सोंटू जैनतर्फे अॅड. देवेंद्र चव्हाण यांनी बाजू मांडली.