अकोला : जन्म नोंदणीसाठी खोटे व बनावट शाळा सोडल्याचे दाखले जोडण्यात आल्याचे धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यात उघडकीस येत आहेत. भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर उशिरा नोंदणी झालेल्या जन्म प्रमाणपत्राची पडताळणी केली जात आहे. बार्शीटाकळी येथील तहसील कार्यालयात बनावट व खोट्या दाखल्यावरून जन्म नोंदणी आदेश निर्गमित करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी १२ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिमांविरोधात किरीट सोमय्या यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

अमरावती जिल्ह्यातील अंजनगावसुर्जी येथे एक हजार बनावट प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी आपला मोर्चा अकोला जिल्ह्याकडे वळवला. अकोला जिल्ह्यातही बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. जिल्ह्यात तब्बल १५ हजार ८४५ जन्म प्रमाणपत्र उशिराने देण्यात आले आहेत. जिल्ह्यात विविध भागांत वास्तव्यास असलेल्यांनी गैरमार्गाने जन्म दाखला मिळवून भारताचे नागरिकत्व मिळवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.

या प्रकरणात त्यांनी महसूल व पोलीस अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन काही पुरावे देखील सादर केले आहेत. या प्रकरणात महसूल विभागाने कागदपत्रे पडताळण्याची मोहीम सुरू केली. बार्शीटाकळी तालुक्यातील जन्म नोंदणी प्रमाणपत्र आदेश मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर केलेल्या व ज्यांना जन्म नोंदणी प्रमाणपत्राचे आदेश निर्गमित करण्यात आले, त्यांच्या सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. या कागदपत्रांमध्ये शाळेच्या दाखल्यावर खोडाखोड किंवा आक्षेपार्ह मजकूर असल्यास ते दाखले शाळेत प्रत्यक्ष जाऊन तपासण्यात येत आहेत. त्याचे अहवाल देखील सादर करण्यात आले.

या तपासणीमध्ये बार्शीटाकळी तहसील कार्यालयातून १२ जणांनी बनावट कागदपत्रे सादर करून जन्म नोंदणी आदेश मिळविल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याविरुद्ध महसूल सहाय्यक संजीव देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले. आरोपी जाकेराबी मजिदखा ऊर्फ जाकेराबी नबी खारा, खडकपुरा, रेहानाबी अब्दुल सत्तार, जंबुनिसा अजिज खान, सै. आशिक अली सै. लियाकत अली, शकिला बी शेर खान, शेख मुसा शेख रौफ, शेख बिस्मील्ला शेख अब्दुला, अकिलाबी शेर इखान, जहाँ आराबेगम मो. शकी, मौ. अब्दुल अजीज शेख मस्ताना, रफीकुन्त्रीसा अब्दुल जब्बार, मान्ती आत्माराम कराळे या आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास बार्शीटाकळी पोलीस करीत आहेत.

Story img Loader