नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या तोतया सर्वेक्षण अधिकाऱ्याने २० विद्यार्थ्यांना न्यायालयात नोकरी लावून देण्याच्या नावाखाली लेखी परीक्षेचे नियोजन केले. विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था म्हणून चक्क आमदार निवास बुक केले. हा प्रयत्न कोतवाली पोलिसांनी हाणून पाडला. पोलिसांनी तोतयाला अटक केली. विजय पटवर्धन ऊर्फ विजय राजेंद्र रणखांब (३३, माहूर, यवतमाळ) असे तोतया अधिकाऱ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय पटवर्धन–रणखांब याने बी. फार्मची पदवी घेतली. त्यानंतर तो बेरोजगार होता. त्याला झटपट पैसे कमवायचे होते. त्यासाठी त्याने बनावट लेटरपॅड, आमदार, खासदार, मंत्री आणि चक्क मंत्रालयातील ८१ प्रकारचे शासकीय कार्यालयाचे रबरी शिक्के तयार केले. तसेच शासकीय अधिकारी आणि मंत्र्यांच्या बनावट सही मारण्याची कला शिकून घेतली. सर्वोच्च न्यायालयाचा रबरी शिक्का वापरून त्याने स्वतःचे सर्वेक्षण अधिकारी म्हणून ओळखपत्र आणि नियुक्तीपत्र तयार केले.
न्यायालयात लिपीक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून नांदेड, यवतमाळ जिल्ह्यातील २० ते २५ तरुणांकडून प्रत्येक ५ ते १० लाख रुपये घेतले. त्यांना लेखी परीक्षा होणार असल्याचे सांगून नागपुरातील चक्क आमदार निवासात मुक्कामी ठेवले. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याला बनावट पत्र दिले. त्यांनीही शहानिशा न करता आमदार निवासात २० खोल्या त्याला दिल्या. त्यानंतर लेखी परीक्षेचे नियोजन करण्यासाठी गांधीबागेतील आदर्श विद्या मंदिर शाळेच्या मुख्याध्यापकाची भेट घेतली. मुख्याध्यापकांनी शाळा उपलब्ध करून दिली. मात्र, पोलीस बंदोबस्त मागण्यासाठी कोतवाली पोलीस ठाण्यात पाठवले.
पोलीस निरीक्षक मुकुंद ठाकरे यांना विजयच्या ओळखपत्रावर संशय आला. त्यांनी लगेच चौकशी करण्यास सुरवात केली. सखोल चौकशी केली असता तो तोतया सर्वेक्षण अधिकारी असल्याचे समोर आले. गुन्हा दाखल करून अटक केली असून शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी घेतली आहे.
यवतमाळात जिल्हाधिकारी कार्यालयाला गंडा
तोतया सर्वेक्षण अधिकारी विजय रणखांब याने गेल्या दोन महिन्यांपूर्वी यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना बनावट पत्र देऊन शासकीय इमारतीत खोली बळकावली. तेथे सर्वोच्च न्यायालयाचे समिती डेस्क कार्यालय थाटले. तेथे दोन अंगरक्षक, दोन लिपिक, एक चालक आणि शिपाई असे कर्मचारी नियुक्त केले. मात्र, कोतवाली पोलिसांनी त्याचे पितळ उघडे पाडल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ उडाली. नागपूर पोलिसांनी यवतमाळातील कार्यालयावर छापा घातला. तेथे ८१ शासकीय कार्यालयाचे रबरी शिक्के आणि बनावट नियुक्तीपत्रांचा ढीग सापडला.
हेही वाचा – काळ्या बिबटनंतर चंद्रपुरात आढळले दुर्मिळ ‘अल्बिनोस’ हे पांढरे हरीण!
स्वतःचे खासगी परीक्षा मंडळ
विजय रणखांब याने आतापर्यंत हीच पद्धती वापरून शासकीय नोकर भरतीचा प्रयत्न केला. त्याने स्वतःचे खासगी परीक्षा मंडळ तयार केले. त्याच्यावर मराठवाड्यात ५ ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. यावेळी त्याने नागपूर शहराची निवड केली होती. पोलिसांनी नागपुरातून लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका जप्त केल्या. तो कोणत्याही शासकीय परीक्षेचा लेखी पेपर हुबेहुब तयार करून देत असल्याची माहिती समोर आली आहे.